hyundai-kona-main-imageHyundai ने त्यांच्या नवीन कॉम्पॅक्ट SUV वरून पडदा बाजूला सारला असून, लवकरच ही नवीन SUV भारतीय बाजारातदेखील उतरवली जाईल. या कॉम्पॅक्ट SUVला Kona असे नाव देण्यात आले आहे. दिसायला अतिशय सुंदर आणि आलिशान असलेली ही गाडी अनेक वैशिष्ट्यांनी सजलेली असल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे. जाणून घेऊया काय आहेत ही वैशिष्ट्ये.

इंजिन – जगभरात लॉन्च करण्यात येणाऱ्या Kona च्या व्हेरिएण्टमध्ये २ लिटरचे ४ सिलिंडरवाले इंजिन असेल. 147 अश्वक्तीच्या या इंजिनचा टॉर्क 179 Nm असेल. या गाडीत ६ स्पीड ट्रान्समिशन देण्यात येईल. गाडीचा टॉप स्पीड 194 kmph इतका असेल, असा दावा कंपनीने केला आहे. तर डिझेल प्रकारातील गाडीत 1.6T-GDI इंजिन असेल. यात ७ स्पीड (7DCT) ट्रान्समिशन देण्यात येईल. पेट्रोल प्रकारातील गाडी 0-100 kmph चा वेग केवळ दहा सेकंदात तर डिझेल प्रकारातील गाडी ७.७ सेकंदात गाठेल, असा दावा कंपनीने केला आहे. या दोन प्रकारांव्यतिरिक्त इंजिनचे अन्य पर्यायदेखील उपलब्ध असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गाडीत इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स असे तीन ड्रायव्हिंग पर्याय उपलब्ध असतील.

खास वैशिष्ट्ये – चालू जमान्यातील गॅझेटस् लक्षात घेऊन Kona मध्ये अनेक खास वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. याच्या इन्फोटेन्मेंट सिस्टममध्ये अॅपल कारप्ले, अॅण्ड्रॉइड ऑटो नॅव्हिगेशन, एचडी रेडिओ आणि 4G टेलिमॅटिक्सचा समावेश असेल. त्याचबरोबर या गाडीत वायरलेस चार्जरदेखील पुरविण्यात येणार आहे. एखाद्या गाडीत वायरलेस चार्जरची सुविधा मिळणे हे कदाचित प्रथमच होत असावे. फोनची बॅटरी पूर्ण चार्ज आहे अथवा नाही हे देखील या चार्जच्या मदतीने कारचालकाला सूचित करण्यात येईल. कारमधील डिस्प्लेमध्ये स्पीड मीटर, सॅटेलाइट नॅव्हिगेशन, ऑडिओ इन्फोसारख्या सुविधा पुरविण्यात येतील. वापरात नसताना हा डिस्प्ले फोल्ड होऊन अपोआप बंद होईल. गाडीच्या पुढील चाकांमध्ये उत्तम तंत्रज्ञान असलेली MacPherson struts सस्पेंशन सिस्टम देण्यात येणार आहे.

hyundai-kona-rear

सुरक्षा – सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील गाडीत अनेक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. यात ‘फॉरवर्ड कॉलिजन-अॅडव्हन्स असिस्ट’ असेल. या सुविधेमुळे गाडीची टक्कर होताच गाडीचे ब्रेक अपोआप कार्यान्वित होतील. याव्यतिरिक्त लेन कीपिंग, ड्रायव्हर अटेंशन वॉर्निंग, रडार बेस्ड स्पॉट मॉनिटर, हाय बीम असिस्ट आणि रियर क्रॉस ट्रॅफिक अलर्टसारख्या सुविधादेखील पुरविण्यात येणार आहेत.

भारतात कधी दाखल होणार – भारतात ही गाडी कधी दाखल होणार हे अद्याप निश्चित झाले नसून, या वर्षाच्या अखेरीस ही गाडी भारतात दाखल होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. गाडीची किंमत अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली असली, तरी Tucson च्या जवळपास या गाडीची किंमत असेल असे बोलले जाते.