Hyundai ची नवीन सॅंट्रो आज अधिकृतपणे लॉन्च केली जाणार आहे. 10 ऑक्टोबरपासून या कारसाठी ऑनलाइन बुकिंग सुरू झाली होती. दिवाळी जवळ आली असताना लॉन्च होत असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून या कारबाबत बरीच चर्चा होती. नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ही कार लॉन्च केली जाणार आहे.

कारअँडबाइकच्या अहवालानुसार ऑनलाइन बुकिंग सुरू होताच 9 दिवसांमध्ये 14,208 जणांनी या कारसाठी नोंदणी केली आहे. अधिकृतपणे या कारची किंमत अद्याप समोर आलेली नाही, मात्र 3.87 लाख रुपयांपासून पुढे किंमत असण्याची शक्यता आहे. मात्र, लॉन्चिंगच्या कार्यक्रमातच अधिकृत किंमतीची घोषणा केली जाईल. लॉन्चिंगआधीच या कारमध्ये कोणते फिचर्स असू शकतात हे समोर आलं आहे. कंपनीने ही कार पुर्णतः नव्या प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. यावरच आधी i10 कार तयार करण्यात आली होती. यावेळी या कारमध्ये ब्लॅक फ्रन्ट ग्रीलसोबत फॉग लाईट दिले जाण्याची शक्यता आहे. जुन्या कारपेक्षा नव्या सँट्रोची लांबी आणि जाडी जास्त असेल पण उंची कमी असण्याची शक्यता आहे. कारच्या टॉप व्हेरिअंटमध्ये 17.64 cm टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम दिलं जाण्याची शक्यता असून यामध्ये अॅपल कार प्ले, अॅन्ड्रॉइड ऑटो आणि मिरर लिंक यांसारखे फिचर्स वापरता येतील. सुरक्षेसाठी यामध्ये अँटी ब्रेक सिस्टीम आणि ड्रायव्हर एअर बॅग सर्वच व्हेरिअंटमध्ये दिलं जाऊ शकतं. याशिवाय टॉप मॉडलमध्ये ड्रायव्हरशिवाय पॅसेंजरसाठीही एअर बॅग असण्याची शक्यता आहे. काही माध्यमांतील वृत्तानुसार, नव्या सॅंट्रोमध्ये १.१ लिटर फोर सिलेंडर इंजिन दिलं आहे. जे ९६ पीएसी पॉवर आणि ९९ न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतं. यात कंपनीने फिटेड सीएनजी किटही दिली आहे. या कारचं सीएनजी व्हेरिएंट 59 पीएस पॉवरसोबत 84 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतं.