Hyundai कंपनीच्या Venue या कारला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळताना दिसतोय. या गाडीचा प्रचार ‘कनेक्टेड एसयूव्ही’ म्हणून करण्यात आला असून ग्राहकांना पूर्णपणे नवीन अनुभव देण्याचा ह्य़ुंदाईचा प्रयत्न आहे. मे महिन्यापासून विक्रीला सुरूवात झालेल्या या कारसाठी एक लाखांहून अधिक जणांनी नोंदणी केल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. भारतात या कारच्या विविध व्हेरिअंट्सची किंमत ६.५० लाख रुपये ते ११.१० (एक्स-शोरुम) लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. कमी किंमतीत दमदार फीचर्स असल्याने ही कार भारतात चांगलीच लोकप्रिय ठरतेय. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेत देखील या कारला मोठ्या प्रमाणात मागणी असून १४०० युनिट्सची निर्यात करण्यात आल्याची माहितीही कंपनीने दिली. आफ्रिकेत २ डिसेंबरपासून या कारच्या विक्रीला सुरूवात होणार आहे.

ब्लू लिंक तंत्रज्ञान – 

Hyundai Venue ३३ नव्या फीचर्ससह पहिली मेड-इन इंडिया कनेक्टेड कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ३३ पैकी १० फीचर केवळ भारतासाठी विकसित करण्यात आले आहेत. यातील काही आधुनिक फीचर्स केवळ BMW7 सारख्या कारमध्ये पहायला मिळतात. Hyundai Venue मधील ३३ कनेक्टेड फीचर एखाद्या अॅप किंवा ह्युमन मशीन इंटरफेसद्वारे जोडले जातील. या गाडीत ब्लू लिंक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ग्राहकांना स्मार्ट मोबिलिटी प्रदान करणाऱ्या या गाडीकडून बाजारात अजून दमदार कामगिरीची ह्य़ुंदाईला अपेक्षा आहे. ह्य़ुंदाईचा कॉम्पॅक्ट आकार नेहमी प्रवास करणाऱ्यांना डोक्यात ठेवून विकसित करण्यात आला आहे. शहरात राहणाऱ्या तरुण मंडळींना आकर्षित करणाऱ्या अनेक सुविधा या गाडीत देण्यात आल्या आहेत. गाडीचे रूपडे बघून डिझाइन प्रीमियम श्रेणीतील गाडीप्रमाणे ठेवण्याचा प्रयत्न केला असल्याचे जाणवते. मात्र ह्य़ुंदाईच्या पारंपरिक शैलीला व्हेन्यू कुठेही छेद देत नाही. गाडीच्या पुढे डार्क क्रेम फ्रंट ग्रिल आहे, ज्यात ह्य़ुंदाईचा नवा सिग्नेचर फेस आहे. गाडीला चौकोनी प्रोजेक्टर हेड लॅम्प देण्यात आले आहेत. हेडलाइटच्या चारही बाजूंना एलईडी डीआरएल देण्यात आले आहेत. यामुळे गाडीचे डिझाइन अधिक आकर्षक बनते. गाडीला १६ इंचांचे डायमंड कट ऑलॉय व्हील देण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे क्रिस्टल इफेक्ट तंत्रज्ञानाचा वापर करणारे एलईडी टेल लॅम्प देण्यात आले आहेत. त्यासह प्रॉजेक्टर फॉग लॅम्प, शार्क फिन अँटेना, स्किड प्लेट्स, दारांचे क्रोम फिनिश असणारे हॅण्डल यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. गाडीचे इंटिरियर सुटसुटीत, सोपे पण आकर्षक ठेवण्यात आले असून तीन रंगसंगतींमध्ये उपलब्ध आहेत. काळा, खाकी रंगसंगती आणि डेनिम रंगसंगती हे पर्याय दिले आहेत. डॅशबोर्डचे डिझाइन स्पोर्टी ठेवण्याचा यात प्रयत्न करण्यात आला आहे. गाडीच्या केबिनमध्ये सुपरविजन क्लस्टर, डिजिटल डिस्प्लेसह एफटीसी, सिल्वर फिनिश असणारे एसी व्हेन्ट, लेदरच्या आवरणातील स्टीअरिंग यासह अनेक गोष्टी देण्यात आल्या आहेत.

सात रंग –

व्हेन्यू ही सात रंगांमध्ये उपलब्ध आहे. ज्यात निळा, भगवा, डीप फॉरेस्ट आणि तीन रंगसंगतीच्या पर्यायांचा समावेश आहे. व्हेन्यू ही ह्य़ुंदाईची पहिली गाडी आहे ज्यात ६ एमटी, ५ एमटी ट्रान्समिशन, त्याचप्रमाणे ह्य़ुंदाईने स्वत:च विकसित केलेल्या ७ स्पीड आधुनिक डय़ुल क्लच ट्रान्समिशनचा समावेश आहे. गाडीत १.२ लिटरचे कप्पा पेट्रोल आणि १.४ लिटरचे डिझेल इंजिन असून प्रथमच कप्पा १.० टबरे जीडीआई पेट्रोल इंजिनच्या पर्यायातदेखील ही गाडी उपलब्ध होणार आहे.

सुरक्षा –

सुरक्षेसाठी गाडीत आधुनिक सुरक्षा प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. यात अ‍ॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह सुरक्षा प्रणाली देण्यात आली आहे. गाडीच्या मजबुतीसाठी उच्च प्रतीच्या स्टीलचा वापर करण्यात आला आहे. रस्त्यांवरून चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी गाडीत फ्रंट क्रॅश बीममध्ये लोअर स्टिफनेरचा प्रयोग करण्यात आला आहे. त्याचबरोबर एबीएस, डय़ुअल एअरबॅग, सीटबेल्ट रिमाइंडर, गाडीच्या मागील बाजूला पार्किंग सेन्सर आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे गाडीच्या उच्च मॉडेलमध्ये ६ ऐरबॅग्ज, हिल असिस्ट, स्टॅबिलिटी कंट्रोल, वेहिकल स्टॅबिलिटी मॅनेजमेन्ट, कॉर्नरिंग लॅम्प, आदी सुविधा आहेत.

कनेक्टिव्हिटी –

ह्य़ुंदाईने व्हेन्यूला ‘भारतातील पहिली ‘कनेक्टेड एसयूव्ही’ असे म्हटले आहे. अत्याधुनिक कनेक्टिव्हिटीसाठी यात ह्य़ुंदाई ब्ल्यू लिंकचा वापर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे चालकाचा आवाज ओळखण्याची क्षमता असलेली क्लाऊड बेस्ड यंत्रणा आहे. ब्ल्यू लिंक तंत्रज्ञानात ३३ सुविधा देण्यात आल्या आहेत. यातील १० सुविधा या भारतीय बाजाराला विचारात घेऊन विकसित करण्यात आल्या आहेत. यात सुरक्षा, वेहिकल मॅनेजमेन्ट रिलेशनशिप सव्‍‌र्हिस, कृत्रिम बुद्धिमत्ता, अलर्ट सर्विस आणि लोकेशन आधारित सेवांचा समावेश आहे. ग्राहकांना पहिल्या तीन वर्षांसाठी ही सुविधा मोफत असणार आहे.