Hyundai कंपनीच्या Venue या नव्या सब-कॉम्पॅक्ट SUV ला ग्राहकांचा शानदार प्रतिसाद मिळताना दिसतोय. 60 दिवसांमध्ये या गाडीसाठी तब्बल 50 हजार जणांनी बुकिंग केलीये. मंगळवारी कंपनीने याबाबत माहिती दिली. 21 मे रोजी ही कार लाँच झाली होती. लाँचिंगनंतर आतापर्यंत 18 हजार गाड्यांची डिलिव्हरी देखील करण्यात आल्याचं कंपनीने सांगितलं. विशेष म्हणजे डिलिव्हरी करण्यात आलेल्यांपैकी 55 टक्के Venue ब्ल्यू-लिंक टेक्नॉलजी असलेल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही व्हेरिअंट्समध्ये ही कार बाजारात दाखल झाली आहे. 6.50 लाख रुपये इतकी या एसयुव्हीच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत आहे. Venue ही सर्वात कमी कालावधीत 50 हजार बुकिंग मिळवणारी Hyundai ची कार ठरल्याचा दावा कंपनीने केला आहे.

सब-कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमधील ही कार देशातील पहिली मेड-इन-इंडिया कनेक्टेड असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. 33 नव्या फीचर्ससह पहिली मेड-इन इंडिया कनेक्टेड कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 33 पैकी 10 फीचर केवळ भारतासाठी विकसित करण्यात आले आहेत. यातील काही आधुनिक फीचर्स केवळ BMW7 सारख्या कारमध्ये पहायला मिळतात. Hyundai Venue मधील 33 कनेक्टेड फीचर एखाद्या अॅप किंवा ह्युमन मशीन इंटरफेसद्वारे जोडले जातील. या कारमध्ये कंपनीने ‘ब्ल्यूलिंक’ कनेक्टिव्हिटी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
फोर्ड इकोस्पोर्ट, महिंद्रा XUV300 ,टाटा नेक्सॉन आणि सब-कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमधील ‘बॉस’ म्हणून ओळख असलेल्या मारुती सुझुकीच्या व्हिटारा ब्रेझा या गाड्यांशी Venue ची थेट टक्कर असणर आहे. कारच्या जवळपास प्रत्येक प्रकारात मारुतीशी स्पर्धा करणाऱ्या Hyundai कंपनीकडे सब-कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये मारुतीला टक्कर देण्यासाठी आतापर्यंत कार नव्हती. पण आता ही कमतरता Venue पूर्ण करणार आहे.

या SUV मध्ये नवीन 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन, 1.2-लिटर नॅचरली अॅस्पायरेटेड पेट्रोल इंजिन आणि 1.4-लिटर डिझेल इंजिन मिळेल. थ्री-सिलिंडर टर्बोचार्ज्ड इंजिनासह 7-स्पीड ड्युअल-क्लच ट्रांसमिशन मिळेल, तर 1.2-लिटर पेट्रोल आणि 1.4-लिटर डिझेल इंजिनमध्ये अनुक्रमे 5 आणि 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे.

विशेषतः भारतासाठी विकसित करण्यात आलेल्या फीचर्समध्ये ड्रायव्हिंग इंफॉर्मेशन/ बिहेवियर, डेस्टिनेशन शेअरिंग, रिअल टाइम व्हेइकल ट्रॅकिंग, व्हेइकल लोकेशन शेअरिंग, जिओ-फेंस अलर्ट, स्पीड अलर्ट, टाइम फेंसिंग अलर्ट, वॉलेट अलर्ट, आयडल अलर्ट आणि व्हॉइस रिकग्निशन या फीचर्सचा समावेश आहे.