खाऊ आनंदे
उन्हाळा म्हटलं की हटकून आठवण येते ती आइसक्रीमची. त्याच्या रंगीबेरंगी आणि स्वादिष्ट दुनियेची ही हटके सफर…

अगदी आबालवृद्धांपासून आइसक्रीम हा सर्वाचा आवडता प्रकार. कट्टर आइसक्रीम प्रेमी तर थंडीतही आइसक्रीमची मजा चाखत असतात. आता गल्लोगल्ली आइसक्रीमची दुकाने झाल्याने आणि पालकदेखील फार उदारमतवादी झाल्याने आइसक्रीमचे हट्ट लगेच पुरवले जातात. फार पूर्वी आइसक्रीम घरी तयार करणं म्हणजे एक सोहळा असायचा. आणि तो सोहळा खास उन्हाळ्याच्या सुट्टीत पार पडायचा. आइसक्रीम तयार करण्याचे भांडे माळ्यावरून काढून ते साफ करणे हा मोठाच उद्योग असायचा. त्या काळात आसपासची सगळी मंडळी या भांडय़ाचा वापर संपूर्ण आणि हक्काने करायची.

boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Loksatta chavdi happening in Maharashtra politics news on Maharashtra political crisis
चावडी: नाना अन् तात्याचे पारावर उपोषण!
loksatta editorial Shinde group bjp dispute over thane lok sabha seat
अग्रलेख: त्रिकोणाच्या त्रांगड्याची त्रेधा!

आइसक्रीम तयार करण्यासाठी हे भांडे बाहेर काढल्यावर घरच्या बच्चे मंडळीची चुळबुळ सुरू व्हायची. मग एखाद्या तरुण दादाकडे बर्फ आणायचे काम सोपवले जायचे. तो बर्फ फोडून तुकडे करणे, ते करताना हळूच बर्फाचा तुकडा पळवणे, यात काय आनंद असायचा. तो थंडगार तुकडा तोंडात विरघळताना एवढा आनंद व्हायचा की त्याकरिता काकाचा एक रट्टा पण पाठीत बसलाय हे विसरायला व्हायचे. मग त्या आइसक्रीम पात्रात दुधाचे मिश्रण ओतल्यावर त्यावर बर्फ आणि मिठाचा थर देऊन ते बंद केले जायचे. खरं तर आइसक्रीम पॉट फिरवणे हे कष्टाचे काम. पण लाडका मामा आपल्या भाचरांना आइसक्रीम मिळावं म्हणून हसत हसत करायचा. हे आइसक्रीम फिरत असताना झाले का तयार म्हणून चार चारदा विचारून त्याला हैराण केले जायचे. शेवटी एकदा ते मऊ, रवाळ आइसक्रीम प्लेटमध्ये पडले की प्लेट चाटूनपुसून साफ व्हायची.

पुढच्या पिढीत अजून थोडा काळ बदलला पण आइसक्रीमची क्रेझ काही कमी झाली नाही. घरी आईने तयार केलेले आइसक्रीम सेट झाले की नाही यासाठी फ्रीजचा दरवाजा दर १० मिनिटांनी उघडून आईच्या हातचा मार खाणारी पण मंडळी होती. इतकेच काय आताच्या डॉक्टर मंडळींनी बाद ठरवलेले टॉन्सिल्सचे ऑपरेशन एका पिढीने टॉन्सिल्स काढल्यानंतर भरपूर आइसक्रीम खायला मिळेल या एका आमिषावर हसत हसत केले. इंजेक्शन घेतल्यानतंर तुला आइसक्रीम देतो या बाबांच्या वाक्यावर किती जणांनी गपगुमान सुया टोचून घेतल्यात. आताच्या पिढीला यातील गंमत कळायची नाही पण एक अख्खी पिढी आइसक्रीमकरिता ‘शहाण्या’सारखी वागली आहे.. असो. या आइसक्रीम पुराणाला असे बरेच पैलू आहेत.

पाचव्या शतकात ग्रीकच्या राजाने बर्फामध्ये मध आणि फळं टाकून खाण्यास सुरुवात केली आणि आइसक्रीमचा शोध लागला. हिप्पोक्रेटिस या वैद्यकतज्ज्ञाने अशा प्रकारे बर्फ खाल्ल्यास तब्येतीला चांगले ठरेल असादेखील सल्ला आपल्या रुग्णांना दिलेला आहे.

चीनमध्ये ६१८ मध्ये ९४ लोकांना ‘आइस मॅन’ हे काम दिले गेले होते. दूध, पीठ आणि कापूर एकत्र करून बर्फापासून आइसक्रीम तयार करून देणे हे त्यांच्या कामाचे स्वरूप होते.

इंग्लंडचा राजा चार्ल्स आपल्या आइसक्रीमच्या रेसिपीचे गुपीत जपून ठेवण्याकरिता वर्षांला ५०० पौंड त्याच्या शेफला देत असत.

युरोपमध्ये आइसक्रीम हेन्री द्वितीयच्या काळात आले. त्याचे लग्न डच राजकुमारीशी झाले होते. ही डच राजकुमारी आपल्यासोबत इटालियन खानसाम्यांना घेऊन आली होती. ते आइसक्रीम बनविण्यात माहीर होते.

भारतामध्ये आइसक्रीमचे दुसरे रूप ‘कुल्फी’च्या रूपात सोळाव्या शतकापासून अस्तित्वात आहे. ‘ऐन- ऐ-अकबरी’मध्ये तर हिमालयाच्या पर्वतरांगांपासून खास बर्फ वाहून आणण्यासाठी नेमलेल्या घोडेस्वाराचा खास उल्लेख आहे.

दूध आटवून त्यात केशर घालून मटक्यात बंद करून कुल्फी बनवण्याच्या अनेक पद्धती आपल्याला भारतीय पाककलेच्या इतिहासात दिसतील.

जसजशी फ्रिज आणि इतर औद्योगिक उत्पादनामध्ये क्रांती झाली, तसतशी आइसक्रीमची चव जगभरात पसरली. आजमितीला जवळजवळ एक हजार वेगवेगळ्या स्वादांमध्ये आइसक्रीम उपलब्ध आहे. ते जिलेटो, कुल्फी, फ्रोजन योगर्ट अशा रूपात आपल्या भेटीला येते. देश, प्रांतनुसार आइसक्रीमचे निरनिराळे स्वाद तयार केले जातात.


जगातले हटके आइसक्रीम स्वाद पाहू या

स्वीट अॅ्क्शन आइसक्रीम
अमेरिकेच्या डेवनर प्रांतात संमाया कोपिकोला रोजच्या जेवणात पालक, बीट आणि बकरीच्या दुधापासून बनवलेले चीज खावे लागे. हे सर्व रोज खाण्याचा तिला कंटाळा आला. मग तिने चक्क या सर्वाना आइसक्रीमचे रूप दिले आणि ‘स्वीट अॅ.क्शन आइसक्रीम’ हा स्वाद अस्तित्वात आला.

आर्यलडचे मर्फी आइसक्रीम
आर्यलडमधील डिंगल गावात किरियन आणि सीन मर्फीचे एक छोटेसे दुकान आहे. आर्यलडमध्ये फार पूर्वी खूप दुष्काळ असायचा. त्यामुळे अन्न वाया घालवू नये असे संस्कार होते. त्यांचा स्पेशल ब्राऊन ब्रेड उरला तर दुसऱ्या दिवशी सूप किंवा इतर पदार्थात वापरला जाई. (रात्रीचे उरलेले पदार्थ दुसऱ्या दिवशी चमचमीत करून खायला घालणे हे जगभरातल्या आयांचे सेम सूत्र आहे.) किरियनकडे असाच कॅरमल घातलेला ब्राऊन ब्रेड खूप शिल्लक होता त्यातून मग मर्फी आइसक्रीमचा जन्म झाला.

शिकागोमधील ब्लॅक डॉग जिलेटो
शिकागोमध्ये जेसिकाचे आइसक्रीम पार्लर आहे. तिला आशियाई टच असलेले जिलेटो बनवायचे होते. मग तिने केळी, व्हाइट चॉकलेट आणि करी पावडर (हो तोच आपला गरम मसाला) याचे कॉम्बिनेशन करून खास वेगळा स्वाद तयार केला, ब्लॅक डॉग जिलेटो.

ज्युरियन, न्यूयॉर्क
ज्युरियन हा प्रसिद्ध फ्लेवर आहे. न्यूयॉर्कच्या चायना टाऊन आइसक्रीमचा. खास चायनिज रेड बिन्स, काळे तीळ आणि झेन बटरच्या साहाय्याने ज्युरियन हा फ्लेवर तयार झाला. याची चव तिळाचे नूडल्स आणि पीनट सॉससारखी लागते.

ऑस्ट्रेलियाचे व्हिस्की प्रॉन
ऑस्ट्रेलियाच्या सिम्मो आइसक्रीमचा हा फेमस फ्लेवर. व्हिस्कीमध्ये मुरवलेले प्रॉन्स वापरून हा फ्लेवर तयार करतात.

मेक्सिकोमधले टकीला आइसक्रीम
मेक्सिकोच्या रोजवूड हॉटेलमध्ये हा खास टकीला फ्लेवर तुमच्या भेटीस येतो.

लॉस एंजलिसमधले चारकोल आइसक्रीम
बरोबर वाचलंय तुम्ही. खास कोळशाच्या फ्लेवरचे आइसक्रीम ब्लॅक कोनमधून तुम्हाला सव्‍‌र्ह केले जाते. हे आइसक्रीम खाल्यानंतर जीभ आणि दात काळे पडतात.

जपानचे क्रॅब आइसक्रीम
जपानमध्ये होकाइदो प्रांतात खेकडय़ाच्या मांसाचा वापर करून क्रॅब आइसक्रीम तयार करतात. जपानमध्ये हे आइसक्रीम फार लोकप्रिय आहे.

याखेरीज जगभरात स्क्विड आइसक्रीम, फिश अॅ ड चिप फ्लेवर आइसक्रीम, ऑयस्टर आइसक्रीम, बेकॉन आइसक्रीम, बीअर आइसक्रीम असे आइसक्रीमचे अनेकविध स्वाद आढळून येतात.

आइसक्रीम संडे
आवडत्या आइसक्रीमचे वेगवेगळे फ्लेवर्सचे मोठ्ठे स्कूप्स, त्यावर रंगीबेरंगी सॉस, जेली, ड्रायफ्रुट्सची पखरण.. कोणत्याही आइसक्रीम पार्लरमध्ये आइसक्रीम संडेच्या उंच ग्लासेसचे हे दृश्य.. आइसक्रीम संडेच्या जन्माची कथा पण मजेशीर आहे.

बर्नर्स सोडा फाऊंटन हे टू रिव्हर्समधील आइसक्रीम शॉप होते. १८८१ पासून रविवारी आइसक्रीमवर चॉकलेट सिरप टाकून सव्‍‌र्ह करायला बर्नर्स या माणसाने सुरुवात केली. तो फक्त रविवारी (संडे) हे आइसक्रीम विकायचा. लवकरच हा आइसक्रीम प्रकार लोकप्रिय झाला. मग लोक त्याला इतर दिवशी हा फ्लेवर मागू लागले आणि त्याचे नामकरण झाले. ‘आइसक्रीम संडे’. १९३९ मध्ये बर्नर्सचा मृत्यू झाला तेव्हा त्याला श्रद्धांजली वाहताना ‘शिकागो ट्रिब्यून’ ने ‘मॅन हू मेड फर्स्ट आइसक्रीम संडे इज डेड’ अशी बातमी केली होती.

इव्हानस्टोन येथे १८९० मध्ये आइसक्रीम सोडा विकणाऱ्याविरुद्ध ‘ब्लू लॉ’ पास केला गेला. हा कायदा पाळण्यासाठी रविवारी तेथील आइसक्रीम दुकानदारांनी आइसक्रीम सोडय़ाऐवजी सिरप टाकून आइसक्रीम विकायला सुरुवात केली. रविवारी विकले जाणारे हे आइसक्रीम ‘आइसक्रीम संडे’ नावाने प्रसिद्ध झाले. न्यूयॉर्कच्या टॉम्कीन्स काऊंटीमध्ये प्लॅट याने आइसक्रीमवर चेरी सिरप आणि चेरी टाकून विकायला सुरुवात केली यात ‘चेरी संडे’ची सुरुवात झाली.

कोन
कोन आइसक्रीम कोणाला आवडत नाही? आइसक्रीमचा कोन हातात घेऊन गप्पा मारत मारत तो संपविणे हा कित्येक हौशी ग्रुप्सचा आवडता उद्योग. ग्रुपमध्ये दोन – तीन वेगवेगळे फ्लेवर्सचे कोन घेऊन एकमेकांचे कोन ते उष्टे झाल्याची भीडभाड न बाळगता चाखणे हा तरुणाईचा वीक पॉइंट! अशा वेळी नेमकं आपण निवडलेल्या आइसक्रीमपेक्षा नेहमी दुसऱ्याचा कोन आपल्याला जास्त स्वादिष्ट लागतो हा भाग वेगळा.. या कोनाच्या जन्माची कथा पण चक्क ११४ वर्षे जुनी आहे.

अमेरिकेत सेंट लुईस येथे वर्ल्ड फेअर चे आयोजन १९०४ मध्ये करण्यात आले. अल्बर्ट नावाच्या लेबनीज व्यापाऱ्याचा यात आइसक्रीमचा स्टॉल होता. उन्हाळ्यााचे दिवस असल्याने अल्बर्टच्या या आइसक्रीमला खूप मागणी होती. त्यामुळे त्याने आणलेले आइसक्रीमचे कप सर्व संपले. पण आइसक्रीम शिल्लक होते आणि मागणीही होती. आता उरलेले आइसक्रीम कसे विकायचे, असा त्याला प्रश्न पडला होता.

त्याचा बाजूचा स्टॉल होता वॅफल्सचा. उन्हाचा पारा चढलेला असल्यामुळे गरम वॅफल्स कोणी फारसे खात नव्हते. त्या वॅफल्सकडे बघून अल्बर्टच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली. त्यांने ते वॅफल्स कोनच्या आकारात मोल्ड केले आणि त्यात आइसक्रीम भरून विकायला सुरुवात केली. त्यातून आइसक्रीम कोनाचा जन्म झाला.

जगातील महागडे आइसक्रीम
जगातील सर्वात महागडय़ा आइसक्रीमची किंमत ऐकून तुमचे डोळे पांढरे होणार आहेत. जगातील सर्वात महागडे आइसक्रीम आहे १.४ दशलक्ष डॉलर्स किमतीचे. (नऊ कोटी रुपये अंदाजे) लुईसाना प्रांतात अनरेड रेस्टॉरंटमध्ये हे आइसक्रीम मिळते. व्हॅनिला आइसक्रीम, स्ट्रॉबेरी, पोर्ट वाइन सॉस, मिंट आणि विशिष्ट मसाल्यापासून ते बनवले जाते. या आइसक्रीमवर सजावटीकरिता ४.७ कॅरटची गुलाबी हिरेजडित अंगठी असते. हे आइसक्रीम खाणे हा खरोखर ‘मिलियन डॉलर एक्सपिरियन्स’ असतो.

जगातील सर्वात महागडे संडे आइसक्रीम मिळते किलीमांजरोला फक्त ६० हजार डॉलर्सना.

आफ्रिकेच्या या डोंगरमाथ्यावर थ्री ट्विन्स आइसक्रीम मिळते. या संडे आइसक्रीमच्या किमतीत टांझानियाचे प्रथम श्रेणीचे विमान भाडे, पंचतारांकित हॉटेलचा राहण्याचा खर्च, टी-शर्ट आणि व्हीआयपी गाइड टूर समाविष्ट आहे.

न्यूयॉर्कमधली सेरेनडिपिटी – थ्री फ्रोजन हॉट चॉकलेट
(२५,००० डॉलर्स) न्यूयॉर्कमधील सेरेनडिपिटी थ्री या रेस्टॉरंटमध्ये पाच ग्रॅम सोन्याच्या पानाने सजवलेले चॉकलेट आइसक्रीम मिळते. त्याची सजावट करण्याकरिता १८ कॅरेट सोन्याचे ब्रेसलेट बनवले असून त्यात एक कॅरेटच्या लखलखत्या हिऱ्याचाही समावेश आहे. याच हॉटेलने त्याच्या ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त खास ‘गोल्डन संडे’ नावाचा आइसक्रीम फ्लेवर लाँच केला. हा फक्त एक हजार डॉलर्सना आहे.

या संडेमध्ये व्हॅनिला, चॉकलेट, कॅडी फ्रूट्स, मार्झावेन आणि उत्कृष्ट ड्रायफ्रूट्स वापरलेली असतात. त्याची सजावट केली असते, २३ कॅरेट सोन्याच्या पानाने.. याच डेझर्ट आइसक्रीममध्ये खास ‘सिग्नेचर कॅवियर’चा स्वाददेखील उपलब्ध असतो. या आइसक्रीमचा स्वाद घेण्याकरिता ४८ तास आधी ऑर्डर नोंदवून बुकिंग करावे लागते.

आपल्याकडेही अहमदाबाद येथे एक हजार रुपयांना एक स्कूप ‘माइटी मिडास’ या स्वादाचे आइसक्रीम मिळते. हॅव मोर या आइसक्रीम ब्राऊनी, हॉट फज, बेल्जियम डार्क चॉकलेट, हॅजलनट चॉकलेट या सर्वापासून बनलेल्या आइसक्रीमवर २४ कॅरेट सोन्याच्या कणांची पखरण केलेली असते.

आइसक्रीमची गंमतजंमत
  • रोमन सम्राट नीरोला आइसक्रीम एवढे आवडायचे की त्याने पर्वतरांगांपासून महालापर्यंत ताजा बर्फ आणण्यासाठी नोकरांची मोठी साखळी तयार केली होती.
  • इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिला याने त्याची सिक्रेट असलेली आइसक्रीमची रेसिपी उघड केल्याबद्दल त्याच्या शेफचा शिरच्छेद केला होता.
  • अमेरिकेचे अध्यक्ष बेन फ्रँकलिन, जॉर्ज वॉशिंग्टन आणि थॉमस जेफरसन यांना आइसक्रीम फार आवडायचे.
  • जॉर्ज वॉशिंग्टन यांनी १७९०च्या उन्हाळ्यात आइसक्रीम खाण्यासाठी २०० डॉलर्स खर्च केले तर जेफरसन यांनी १८ टप्प्यांची आइसक्रीमची रेसिपी दिली होती.
  • न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, फिनलँड आणि स्वीडन हे जगातील सर्वाधिक आइसक्रीम खाणारे पहिले पाच देश आहेत.
  • जगातला सर्वात मोठा नऊ फूट आइसक्रीम कोन इटलीत बनवला गेला.
  • ८७ टक्के अमेरिकन नागरिकांच्या फ्रीजमध्ये आइसक्रीम असतेच.
  • एक सिंगल आइसक्रीम स्कूप संपवायला ५० वेळा लिक करावे लागते.
  • कुत्र्यांना देखील आइसक्रीम आवडते.
  • १७७६ मध्ये पहिले आइसक्रीम पार्लर न्यूयॉर्कमध्ये उघडले.
  • १२ गॅलन दुधापासून १ गॅलन आइसक्रीम बनते.
  • जगात सर्वात जास्त खप व्हॅनिला आइसक्रीमचा होतो.
  • एकटय़ा अमेरिकेत १.५४ बिलियन गॅलन आइसक्रीम दरवर्षी खाल्ले जाते. भारतात दरवर्षी ३३३ दशलक्ष लिटर आइसक्रीम खाल्ले जाते.

रश्मी करंदीकर – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा