रिलायन्स जिओ बाजारात आल्यानंतर स्पर्धक कंपन्यांमध्ये जोरदार चढाओढ सुरु झाली. या स्पर्धेत आपला टिकाव लागावा यासाठी कंपन्यांनी आपले नवनवे प्लॅन्स जाहीर करण्यास सुरुवात केली. यामध्ये एअरटेल, व्होडाफोन, बीएसएनएल आणि आयडिया सेल्युलर या कंपन्या आघाडीवर आहेत. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी नुकताच १४९ रुपयांचा एक नवीन प्लॅन बाजारात आणला आहे. याची वैधता २१ दिवसांची आहे. हा प्लॅन एअरटेल आणि बीएसएनएलला टक्कर देण्याची शक्यता आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसोबतच १०० मेसेज प्रति दिन मिळणार आहेत. नुकताच बीएसएनएलने आपला ९९ रुपयांचा प्लॅन जाहीर केला होता. यामध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता देण्यात आली होती.

आयडियाच्या या नव्या प्लॅनमध्ये लोकल, नॅशनल आणि रोमिंग कॉलिंग फ्री मिळणार आहे. मात्र, कंपनीने या प्लॅनमध्ये व्हॉईस कॉलिंगसाठी काही मर्यादा ठेवल्या असून त्यानुसार दिवसाला २५० मिनिटे मोफत तर आठवड्याला १००० मिनिटे मोफत मिळणार आहेत. यासोबतच वैधता असेपर्यंत १०० युनिक नंबर्सवरही कॉलिंग केलं जाऊ शकतं. सध्या हा प्लॅन काही सर्कल्समध्येच सुरु करण्यात आला आहे. तर, येत्या काळात इतरही सर्कलमध्ये हा प्लान सुरु करण्यात येईल. व्हॉईस कॉलिंगसाठी असलेल्या या प्लॅनमध्ये डेटाचे फायदे मिळणार नाहीत असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे इंटरनेट डेटासाठी वेगळे रिचार्ज करावे लागेल.