24 January 2019

News Flash

चिरतरुण दिसायचंय ? मग ‘या’ टीप्स नक्की वाचा

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी महागड्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करण्याची आवश्यकता नसते, तर घरगुती उपचारांनीही त्वचेच्या समस्या दूर होऊ शकतात.

प्रातिनिधिक छायाचित्र

दररोजच्या धावपळीत अनेकदा आपले स्वत:कडे लक्ष देणे राहून जाते. मात्र आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे. जेवणाच्या वेळा, खात असलेले पदार्थ, अपुरी झोप, प्रदूषण, ताण यांचा शरीरावर आणि मनावर होणारा परिणाम दिसून येतो. त्वचा हे परिणाम दाखविणारा महत्त्वाचा घटक आहे. शरीराचा अतिसंवेदनशील भाग असणाऱ्या त्वचेवरुनही एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याचा अंदाज सहज लावणं शक्य होतं. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी जाहिरातींमध्ये दाखवल्याप्रमाणे महागड्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करण्याची आवश्यकता नसते, तर घरगुती उपचारांनीही त्वचेच्या समस्या दूर होऊ शकतात. त्यासाठी योग्य गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. पाहूयात चिरतरुण राहण्यासाठी त्वचेची कशा पद्धतीने काळजी घ्यायला हवी…

१. भरपूर पाणी प्या – दिर्घकालीन डिहायड्रेशन असेल तर तुमची त्वचा लवकर सुरकुतते. उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशनचा त्रास होतो आणि त्याचाही त्वचेवर परिणाम होतो. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी, सरबते, ताक, नारळपाणी पिणे हा त्यावरील उत्तम उपाय ठरतो. पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर तरतरी येते. त्यामुळे चेहरा टवटवीत दिसण्यासाठी दिवसाला किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.

२. ताण घेऊ नका – करीयर, नातेसंबंध, कुटुंब, अभ्यास यांसारख्या विविध ताणांचा शरीरावर तसेच त्वचेवर वाईट परिणाम होतो. हा ताण घालविण्यासाठी ध्यान करणे, व्यायाम करणे, छंद जोपासणे असे उपाय करावेत. त्यामुळे तुम्ही आतून फ्रेश व्हाल आणि ताण कमी झाल्याने त्वचाही तुकतुकीत दिसण्यास मदत होईल.

३. क्लिंझिंग – आपण दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतो. त्यावेळी प्रदूषणामुळे हवेतील कण आपल्या चेहऱ्यावर चिकटतात. तसेच घाम आणि इतर गोष्टींमुळे त्वचा खराब होते. त्यामुळे ठराविक वेळाने चेहरा धुणे आवश्यक असते. आता हा चेहरा धुताना कोणताही साबण लावण्यापेक्षा आपल्या त्वचेला सूट होणारे एखादे क्लिंझिंग वापरल्यास जास्त फायदा होतो. त्यामध्ये असणारे घटक चेहऱ्याचे मॉईश्चर टीकवून ठेवण्यास उपयुक्त असतात.

४. मॉईश्चरायझर वापरा – चेहऱ्याची त्वचा चांगली रहावी यासाठी काही उपाय करणे आवश्यक असते. चेहरा धुतल्यानंतर तो काही वेळा कोरडा पडतो. त्यामुळे सुरकुत्या आल्यासारखेही दिसते. त्यामुळे चेहरा धुतल्यावर आपल्याला सूट होईल असे एखादे मॉईश्चर हलक्या हाताने चेहऱ्यावर लावावे. त्याचा त्वचा चांगली दिसण्यास निश्चितच फायदा होतो.

५. जंक फूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा – आपण खात असलेल्या गोष्टींचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. जास्त मसालेदार, तेलकट पदार्थ खाल्ल्यास चेहऱ्यावर फोड येण्याची शक्यता असते. त्यामुळे जंक फूड तसेच प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळलेलेच बरे. जंक फूडमध्ये असणाऱ्या पदार्थांमुळे शरीरातील आवश्यक घटक कमी होतात आणि त्याचा विपरीत परिणाम होतो.

First Published on April 12, 2018 10:30 am

Web Title: if you want to look young keep this things in mind for slow down ageing easy tips