ये मौसम का जादू है मितवा.. असंच काहीसं असतं पावसाळा आणि पावसाळ्यातल्या ट्रेकिंगचं. पावसाळी वातावरणाची जादू अनेक तरुणांच्या मनावर होते आणि मग ते निघतात ट्रेकिंगला. पावसाळा आणि ट्रेकिंग हे समीकरण म्हणजे तरुणांचा आवडता विषय. पावसाळा सुरू झाला आणि ट्रेकिंगचा प्लॅन झाला नाही असं शक्यतो होत नाही. खिडकीत बसून पावसाचा आनंद घेण्यापेक्षा थेट निसर्गाच्या कुशीत जाऊन पाऊस अनुभवण्याचे बेत ठरवत अनेकांनी ट्रेकसाठी प्लॅन तयार केले असतील. पण याआधी काही गोष्टींची काळजी नक्की घ्या. पावसाळ्यात फिरायला जाताना किंवा ट्रेकिंगला जाताना काय काळजी घ्याल…

– पावसाळी भटकंतीत कपडय़ांचा एक जास्तीचा जोड कायम सोबत असावा. सॅकमधील कपडे भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.

– गावातील गावकऱ्यांच्या सूचनांचा योग्य तो मान राखा. आपण एखाद्या ठिकाणी वर्षातून फक्त एकदाच जातो त्यामुळे आपल्याला तेथे असलेल्या धोक्यांची कल्पना नसते. परंतु गावकरी वर्षानुवर्षे तेथेच राहत असल्यामुळे त्यांना आजूबाजूच्या परिसराची संपूर्ण माहिती असते.

–  ओढे, नाले, धबधब्यांजवळ खूप काळजी घ्यावी. या ठिकाणी सारेचजण रमतात. पण एकतर डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा वेग अधिक असतो आणि त्यातच जर पाऊस पडायला लागला तर पाहता पाहता हा पाण्याचा प्रवाह वाढू लागतो. अशा वेळी जिवावर बेतण्याचे प्रसंग गुदरतात. अनोळखी ओढा तर स्थानिकांच्या मार्गदर्शनाशिवाय पार करूच नये.

– आहारात शक्यतो चहा, सूप यासारख्या गरम पदार्थाचे प्रमाण अधिक ठेवावे. पावसात शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशनचा धोका संभवतो. त्यामुळे जाणीवपूर्वक पाणी अधिक प्यावे.

– भटकंतीला जाण्यापूर्वी त्या स्थळाची, वाटांची, पूर्ण माहिती करून घ्या.

– रात्रीचा मुक्काम उघड्यावर किंवा निर्जन स्थळी मुक्काम करणे टाळावे.

– ST किंवा सार्वजनिक वाहनाने प्रवास करताना परतीच्या वेळापत्रकाची योग्य ती काळजी घ्या.

– पायात रबरी बूट घालावे. चप्पल किंवा सँडल घालणे टाळावे.

– भटकंतीला जाताना ज्यांच्या बरोबर जाणार आहात त्या पैकी एका व्यक्तीचा मोबाईल क्रमांक घरात देऊन ठेवा.

– सर्वात मुख्य म्हणजे मद्यपान, धिंगाणा आणि कर्णकर्कश गाणी टाळा.

(( माहिती – पंकज समेळ यांच्याब्लॉगमधून))