मुलींना आणि महिलांना तयार होताना मुख्य प्रश्न असतो तो आपल्या केसांचे काय करायचे. दिवाळीसारख्या सणादरम्यान साडी किंवा भरजरी ड्रेस घातल्यावर कोणती हेअरस्टाईल आपल्यावर खुलून येईल हे आपल्याला समजत नाही. त्यातही केस लहान असतील किंवा खूप कुरळे किंवा खूप सिल्की असतील तर त्याची हेअरस्टाईल करणे हा एकप्रकारचे टास्कच असते. मग कधी एखाद्या मैत्रिणीला गाठणे नाहीतर थेट पार्लरमध्ये जाण्याचा पर्याय मुली स्वीकारताना दिसतात. पण तसे न करता आपल्या आपणच एखादी हेअरस्टाईल करणाऱ्याही अनेकजणी असतात. मात्र असे करताना केस तुटण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय काही चुकांमुळे केस गळायलाही सुरुवात होते. असे होऊ नये यासाठी किमान गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

* घाईच्या वेळी किंवा कधी हाती काही लागले नाही तर मुली इलॅस्टिक रबरबँडने पोनी बांधतात. मात्र अशाप्रकारच्या रबराने केस बांधल्याने ते तुटण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा इलॅस्टिकऐवजी कपड्याचे रबरबँड वापरलेले केव्हाही चांगले. अशा हेअरबँडमुळ केस तुटण्यापासून वाचतात.

* कुठे बाहेर किंवा एखाद्या कार्यक्रमाला जायचे असले की केस धुणे हे महिलांचे पहिले काम असते. अशाप्रकारे केस धुतल्यानंतर ते वाळविण्यास वेळ नसल्याने किंवा सेटिंग करायचे असल्याने ब्लो ड्रायरचा वापर बऱ्याच जणी करतात. याशिवाय केसांना कर्ल किंवा स्ट्रेट करण्यासाठी स्ट्रेटनेर, आयर्निंग मशीन नियमित वापरल्याने केसांचा पोत बिघडतो. त्यामुळे केस जितक्या नैसर्गिक पद्धतीने ठेवता येतील तितके चांगले.

* बऱ्याचदा हेअरस्टाइल करताना केस मोठे दिसावेत यासाठी एक्सटेंशन्स वापरले जाते. यामुळे डोके जड झाल्यासारखे वाटते. डोक्यावर, केसांवर एक्स्टेंशनमुळे वजन येते आणि केस गळू लागतात. अनेकदा एक्स्टेंशन लावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या क्लिपांमुळे केस तुटण्याचीही शक्यता असते. त्यामुळे केस तुटू नयेत म्हणून चांगले एक्स्टेंशन वापरा तसेच त्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.

* बहुतांश जण ओले केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करतात, मात्र त्या उष्णतेमुळे केस खराब होऊ शकतात. तसेच केसांचे नुकसान टाळण्यासाठी ओल्या केसांची कोणतीही स्टाईल करू नका.