ओंकार वर्तले – response.lokprabha@expressindia.com
सह्याद्रीतील भटकंती ही कायमची काही तरी नवीन शिकवणारी असते. त्यातच तुम्ही आडवाटेवरच्या किल्ल्यावर गेलात तर चार गोष्टी अधिकच कळतात.

थंडीचा उत्तरार्ध सुरू झाला होता. उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवातच झाली होती. त्यामुळे लवकरात लवकर एखादा ट्रेक आखावा अशी आम्हा मित्रांमध्ये चर्चा सुरु होती. या वेळी जरा आडबाजूचे आणि वेगळे किल्ले पाहू, असं एका मित्राने केवळ सांगितलंच नाही तर आख्खा प्लानच समोर ठेवला. पठ्ठय़ानं ‘होमवर्क’ केला होता. तसं पाहिलं तर ट्रेकचं शालेय अभ्यासासारखं नसतं बरं का! म्हणजे एखाद्या मित्रानं अभ्यास केल्यावर इतरांचे जसे कपाळावर आठय़ा पडल्यासारखे हावभाव होतात तसे. आमच्या ट्रेकर्स मंडळीत जो कोणी नवा प्लान करेल त्याला डोक्यावर घेतात. त्याचे कौतुक करतात. समोरचा तो प्लॅन पाहून एकदम भारीच वाटले. एकदम नवे कोरे अन् आडबाजूला असलेले मोरधन, कावनई अन त्रिंगलवाडी असे तीन किल्ले. नावं वाचूनच मोहीम ठरली. अजून माहिती गोळा केली. अन् शुक्रवारी रात्रीच गाडी नाशिकमधील इगतपुरी तालुक्यात  घोटीपर्यंत आणली.

रात्रीचे सात-साडेसात झाले असतील. घोटीत चहा प्यायला आम्ही खाली उतरलो. चहा पितापिताच टपरीवाल्याला मोरधन किल्ल्याचा रस्ता सहज म्हणून विचारला. मोरधन हे नाव ऐकताक्षणीच तो टपरीवाला बावचाळला अन् म्हणाला, ‘‘ओ, भाऊ, असा किल्ला काय मला माहीत नाय.’’ आतापर्यंत गोड लागलेला चहा एकदम कडू लागायला लागला. एक मित्र तर त्याच्या अंगावरच धावून गेला. ‘‘काय..मोरधन माहीत नाही. अरे असे कसे रे तुम्ही शिवभक्त. एवढय़ा जवळ असूनदेखील तुम्हाला किल्ल्यांबद्दल प्रेम नाही..’’ वगैरे-वगैरे. तो भडाभडा बोलत होता. आम्ही इतरांनी त्याला शांत केलं अन् त्या टपरीवाल्याला दोन्ही हात जोडून नमस्कार केला अन् मनातल्या मनात त्याच्या या महाराष्ट्रातल्या मातीतल्या जन्माचे आभार मानले आणि आम्ही पुढे निघालो. खरं तर मोरधनचा रस्ता विचारण्याची चूक आमचीच होती. त्याला बिचाऱ्याला दोष देऊन काय फायदा? मोरधन हा तसा काही इतरांच्या दृष्टीने प्रसिद्ध वगैरे किल्ला नव्हता. त्यांच्यासाठी तो साधाच डोंगर होता. नाही तरी आपण किती गड-किल्ल्यांची माहिती ठेवून त्यांचे संवर्धन करतो म्हणा. या महाराष्ट्रात असे बरेच ‘मोरधन’ उपेक्षित आहेत. ठरावीक किल्ल्यांना मिळणारा जनाधार सोडला तर इतर किल्ले हे कमनशिबीच ठरले आहेत. प्रश्नांचा हा गुंता सोडवतच गाडी घोटीवरून खरवाडीत कधी आली ते कळलंच नाही. मध्यरात्र झाली होती. गावातल्याच मारुती मंदिरात पथारी मांडली. प्रत्येक ट्रेकमध्ये निवाऱ्याची सोय आम्हा फिरस्त्यांना करून देण्यासाठी मारुतीराया आमच्यावर नेहमीच कृपादृष्टी असते. येथेही तो धावून आला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मोरधन अन् कावनई असे दोन्हीही किल्ले पाहून झाले पाहिजे या काळजीपोटी आम्ही झोपूनही गेलो.

पहाटे मंदिरातल्या घंटेच्या आवाजानेच जाग आली. एवढय़ा पहाटे आलेल्या त्या भक्ताने आम्हाला तर उठवलेच, पण मारुतीरायालाही उठवले असेच वाटून गेले. सकाळचे सारे सोपस्कार उरकून तयार झालो. तांबडं फुटून आकाशात पूर्व दिशेला केशरी तांबूस रंगाची चादर पसरली होती. गावातूनच एक वाटाडय़ा घेऊन आम्ही मोरधनला भिडलो. चालता-चालता तो वाटाडय़ा म्हणाला, ‘‘सायेब.. वर बघण्यासारख काहीच नाही. इथं फारच कमी लोक येतात. तुमाला लईच आवड दिसतीया किल्ल्यांची.’’ त्याच्या बोलण्याचं हसू येत होतं. पण म्हटलं आता काय बोलायलाच नको. एव्हाना आम्ही तासाभरात डोंगराचा पहिला टप्पा पार करून पठारावर आलो. सपाट चालीची वाट धरली. ही वाट पुढे पुन्हा मोरधनच्या मुख्य डोंगराकडे वळून चढणीची लागली. अध्र्या तासात आम्ही गडमाथ्यावर हजर झालो. सकाळी आठ वाजले होते. धुक्याची चादर अजूनही खरगावावर अंथरलेली दिसत होती. वाटाडय़ाचं म्हणणं खरं ठरलं होतं. कारण अवघी दोन पाण्याची टाकी अन् घरांची जोती एवढं सोडलं तर मोरधनवर बघण्यासारखं काही नाही. पण एखाद्या दुर्गभटक्याला याशिवाय तरी आणखी काय हवं असतं म्हणा. आणि दृष्टीचा हाच फरक त्याच्यात आणि इतरांच्यात दिसत असतो. असो. गडमाथ्यावरून दिसणारा कळसूबाई डोंगररांगेचा कॅनव्हास मात्र लाजवाबच होता. धुक्याची चादर विरळ होत चालली होती, सह्य़रांगेचे रूप पालटत होते. हे निखालस दृश्य पाहून परतीचा मार्ग आम्ही पकडला. आता आमची गाडी कावनईच्या दिशेने धावत होती. कावनई महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने अजून एक अनोळखी किल्ला. एक मात्र बरं होतं म्हणा. या कावनईला कुंभमेळ्याच्या संदर्भाने एक आगळी ओळख आहे. या गावाचं आध्यात्मिक महत्त्व फार मोठं आहे. कावनई हे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे या कावनईला किल्ल्यापेक्षाही धार्मिक अंगाची ओळख जास्त होती. हाच संदर्भ घेत आम्ही अप्पर वैतरणामार्गे केळदवरून कावनई हे पायथ्याचं गाव गाठलं. गाव मोठ टुमदार आहे. गावातच गाडी लावली. किल्ल्याची एक सोंड गावात उतरलेली आहे. त्या सोंडेवरूनच आम्ही गडावर निघालो. स्थानिक लोकांशिवाय गडावर अगदी मोजकेच दुर्गमित्र येतात. यंदा आमचीही त्यात भर पडली. येथे येणाऱ्या दुर्गमित्रांचं येथल्या लोकांना फारंच कौतुक. पुण्या-मुंबईहून फक्त हा डोंगर बघायला आलात म्हणून एका आजीबाईने तर डोक्यालाच हात लावला. नंतर तिला कौतुकही वाटलं म्हणा. कावनईवर मोरधनपेक्षाही जास्त अवशेष आहेत. सुरुवातीला एक लोखंडी शिडी लावलेली दिसते. यानंतर एका उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून आपण माथ्यावर हजर होतो. गडावर पडक्या इमारती, एक सुंदर तळं आणि कावनई देवीचं मंदिर आहे. गडाचा माथा आटोपशीर असून विशेष उल्लेख तळ्याचा करावा लागेल. या तळ्यात रंगीबेरंगी मासे हजारोंच्या संख्येने आहेत. या गडावरच एका साधूचा हल्ली मुक्काम असतो. कावनईवरून खाली उतरताना संध्याकाळ उलटून गेली होती. दिवसभराच्या पायपिटीने भूकही सडकून लागली होती. जेवणासाठी आम्ही इगतपुरी गाठली. येथूनच आम्हाला रात्री त्रिंगलवाडीला जायचं होतं.

रात्रीचे जेवण उरकून आम्ही मुंबई-नाशिक हायवेवरून कसाऱ्याच्या दिशेने अलीकडे म्हणजे नाशिकच्या बाजूने असणाऱ्या टाके गावावरून त्रिंगलवाडीची तळ्याची वाडी गाठली. मुक्कामाला गावात मंदिर नव्हते त्यामुळे मोठी समस्याच निर्माण झाली. पण आदरातिथ्याला कमी पडेल ती सह्यद्रीची कूस कुठली? गावातल्या चार-पाच युवकांना आमची अडचण लक्षात आली. त्यांनी लागलीच गावातलं समाजमंदिर झाडून साफ करून लाइटचीही सोय करून दिली. त्यांच्या या धडाडीचं मोठं कौतुक वाटलं. कसलीही अपेक्षा न ठेवता पाहुण्यांची सोय करताना पाहून स्वार्थी शहरी संस्कृती आमच्या डोळ्यासमोरून तरळून गेली. असो. दिवसभराच्या दगदगीने रात्री लगेच डोळा लागला. सकाळी रात्रीच्या युवकानेच आम्हाला जागे केले. फक्कड चहाला घरी नेले. एवढेच नव्हे तर तो किल्ला दाखवायलाही बरोबर येणार होता. खरं म्हणजे एवढय़ा आपुलकीची सवय नसणाऱ्या आम्हाला तर संकोचल्यासारखं झालं होतं. पण आता या प्रेमाच्या हाकेला ओ देऊन त्रिंगलवाडी किल्ल्याकडे कूच झालो.

त्रिंगलवाडीच्या किल्ल्यासाठी येथे बऱ्यापैकी पर्यटकांची वर्दळ असते. डोंगरात खोदलेली जैन लेणी, कातळकोरीव पायऱ्या, मारुतीरायाची सुरेख मूर्ती, गडमाथ्यावर असलेले इमारतींचे अवशेष, गुहा, पाण्याच्या टाक्या हे सारं पाहायला मिळते. संपूर्ण किल्ला पाहायला दोन तास पुरतात. किल्ला पाहून आम्ही खाली गावात येईपर्यंत दुपार झाली होती. बरोबरच्या युवकाला किती रुपये द्यायचे असे विचारले तर तो म्हणाला, ‘‘द्या किती द्यायचे ते.’’ आता सर्द व्हायची वेळ आमची होती. व्यावहारिक आधुनिक जगापासून ही माणसं अजून किती लांब आहेत याचं आश्चर्य वाटलं. कोणताही स्वार्थ नाही की अडवणूक नाही. उलट आपुलकी भरभरून असलेल्या या लोकांना असं वागायला कसं जमतं हा प्रश्न आम्हाला पडला होता. पण याचं रहस्य हा आजूबाजूला पसरलेला सह्यद्री होता हे आम्हाला कळून चुकलं. सह्यद्रीची हीच कूस आम्हा रसिक भटक्यांसाठी कायमच मायेने भरलेली असते. हिचीच ओढ लागून आम्ही येथे येत असतो. अनुभवांचं समृद्ध दालन असलेल्या या कणखर ‘पुराणपुरुषाचा’ हा महिमा खरोखर आम्ही पायस्थांनी कसा वर्णावा याचं कोडं आम्हाला नेहमीच पडलेलं असतं.

त्रिंगलवाडीवरून घराकडे परतीच्या दिशेने जाताना हा सह्याद्री बरेच काही अनुभवाचे धडे शिकवून गेला होता. भटकंतीच्या पोतडीत हे सारे अनुभव दर वेळीच जमा होत असतात. यातच आमच्यासारखी अतृप्त मंडळी समाधानी होण्याचा प्रयत्न करीत असतात.
सौजन्य – लोकप्रभा