सर्व प्रकारच्या कर्करोगांची वाढ रोखणारा औषधाचा रेणू शोधण्यात आला असून त्यात प्रतिकारशक्ती प्रणालीस उत्तेजन मिळते, परिणामी कर्करोगाची वाढ रोखली जाते, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.

एसए ४-१ बीबीएल या रेणूचा प्रकार हा प्रथिनाच्या रूपातील असून त्याचा वापर कर्करोगाच्या लसी प्रभावी करण्यासाठी केला जातो. आतापर्यंत वैद्यकपूर्व चाचण्यात त्याचा उपयोग सिद्ध झाला आहे, अमेरिकेतील लुईलव्हिले विद्यापीठातील संशोधकांचे म्हणणे आहे. प्रतिकारशक्ती प्रणालीतील सीडी ८ प्लस या टी पेशींचा प्रभाव यात वाढवला जातो. त्यातून कर्करोगाच्या गाठींवर हल्ला करण्यात या पेशी सहभागी होतात, असे कॅन्सर रिसर्च या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. संशोधकांनी उंदरांवर एसए ४-१ बीबीएल रेणूचे प्रयोग केले असता या उंदरांना कर्करोगापासून संरक्षण मिळाले. कर्करोगाच्या गाठी शरीरात कुठेही असतील, तरी या औषधाने त्याला विरोध केला जातो, असे लुईसव्हिले विद्यापीठातील प्राध्यापक हॅवल शिरवान यांनी म्हटले आहे. साधारणपणे प्रतिकारशक्ती प्रणाली ही जेव्हा उद्दीपित होते, तेव्हा या कर्करोगाच्या गाठींची ओळख पटण्यास मदत होऊन त्याला प्रतिकार केला जातो. या रेणूमुळे गाठींची जैविक टेहळणी सीडी ४ प्लस व एनके पेशींमुळे सुरू होते, त्यामुळे कर्करोगापासून संरक्षण मिळणे सोपे जाते. अनेक आठवडे या औषधाचा परिणाम राहतो.

शिवाय त्यामुळे मुळातच कर्करोगाच्या गाठी तयार होण्याच्या जैविक प्रक्रियेस आळाही बसतो. कर्करोगात प्रतिकारशक्ती प्रणाली फसत जाते आणि गाठींना आळा बसत नाही, त्यामुळे हा रेणू त्यात उपयोगी पडून कर्करोगाच्या गाठींवर मात करतो.