17 December 2017

News Flash

जाणून घ्या व्हे प्रोटीन म्हणजे नेमके काय…

लठ्ठपणा कमी होण्यास मदत

सौरभ कुलकर्णी, फिटनेसतज्ज्ञ | Updated: October 5, 2017 12:33 PM

चुकीच्या जीवनशैलीमुळे सध्या पोटाचा आणि कंबरेचा घेर वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. लठ्ठपणा वाढायला लागला की आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करायची आहे याची आपल्याला जणीव होते. मग अनेक उपाय ट्राय करुन पाहिले जातात. व्हे प्रोटीन हे आपण कधीतरी ऐकून असतो पण त्याबाबत आपल्याला पुरेशी माहिती नसते. मात्र ज्यांना लठ्ठपणा कमी करायचा आहे अशांनी आपल्या आहारामध्ये व्हे प्रोटीनचा समावेश जरूर केला पाहिजे. मात्र हे घेत असताना त्याबाबत नेमके ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याचा आहारात समावेश करण्यापूर्वी व्हे प्रोटिन काय आहे ? ते किती प्रमाणात घेतले पाहिजे? आणि त्याचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊया…

व्हे प्रोटिन म्हणजे काय ?

मुख्यत्वे दुधावर प्रक्रिया केल्यानंतर दोन प्रकारचे प्रोटिन्स मिळतात. त्यातील एक व्हे व दुसरे केसीन प्रोटिन होय. दुधापासून चीज बनवताना जो द्रवरुप पदार्थ मागे राहतो त्याचे पावडर फॉर्ममध्ये रूपांतरण म्हणजे व्हे प्रोटिन. इतर प्रोटीन्सच्या तुलनेमध्ये व्हे प्रोटीनमध्ये शरीरास आवश्यक असलेल्या अॅमिनो अॅसिडची मात्रा जास्त असल्यामुळे त्यास एक परिपूर्ण प्रोटिन मानले जाते.

व्हे प्रोटीन सेवनाचे प्रमाण –

व्यायामाचा अभाव असलेल्या व्यक्तींकरता सर्वसाधारणपणे शरीराच्या एकूण वजनाच्या प्रति किलो प्रमाणात ०.८ ते १ ग्रॅम प्रोटीनची आवश्यकता असते. उदा. एखाद्या व्यायाम न करणाऱ्या व्यक्तीचे वजन पन्नास किलो असेल तर त्या व्यक्तीने किमान चाळीस ते पन्नास ग्रॅम प्रोटिन्स दिवसभरात घेणे आवश्यक असते. याउलट नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला प्रोटीनची आवश्यकता साहजिकच जास्त असते. अशा व्यक्तीने १ ते २ ग्रॅम प्रति किलो बॉडी वेट प्रोटिन घेणे आवश्यक आहे.

नियमित व्हे प्रोटिन घेण्याचे फायदे –

* शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
* स्नायूंची घनता व ताकद वाढण्यास मदत होते.
*हृदयाचे कार्य सुधारते.
*कुठल्याही कारणाने झालेली शरीराची झीज भरून काढण्यास मदत होते.
*रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

सौरभ कुलकर्णी, फिटनेसतज्ज्ञ

First Published on October 5, 2017 12:32 pm

Web Title: importance of whey protein to reduce weight