News Flash

बचतीचे ‘हे’ पर्याय तुम्हाला माहितीयेत? 

अवघ्या ५०० रुपयातही होऊ शकते स्मार्ट बचत 

भविष्यासाठी पैशांची बचत करून ठेवणे नेहमीच शहाणपणाचे असते, पण कोणत्याही अनपेक्षित आपत्तीचा सामना करण्यास मदत करणाऱ्या साधनांमध्ये तुमची बचत गुंतवणे आणखी शहाणपणाचे आहे. गुंतवणूक करण्यास सुरुवात करण्यासाठी तुम्हाला मोठ्या रकमेची गरज नसते. अशा कितीतरी योजना असतात ज्यांमधून तुम्हाला दरमहा किंवा वर्षाला रु ५०० किंवा त्याहून कमी रकमेची गुंतवणूक करूनसुद्धा खात्रीशीर परतावा मिळू शकतो. काय आहेत या योजना पाहूया…

प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय) दरवर्षी  १२ रुपये :

हे वाचून तुमचा कदाचित त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र या योजनेचा वार्षिक प्रिमियम कर वगळता १२ रुपये एवढाच आहे. ही एक शासन पुरस्कृत अपघात विमा योजना आहे जी १८ ते ७० वर्षे वयोगटांतील सर्व भारतीय नागरिकांसाठी खुली आहे. अपघाती मृत्यु ओढावल्यास किंवा पूर्णत: अपंगत्व आल्यास नामनिर्देशितीला २ लाख रुपये मिळतील किंवा अंशत: कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १ लाख रुपये मिळतात. सर्व बँकखाते धारकांना त्यांच्या नेटबँकिंग सेवांमार्फत या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. या योजनेची १ वर्षाची सुरक्षा १ जून ते ३१ मे अशी असेल.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना दरवर्षी ३३० रुपये :

ही आणखी एक शासन पुरस्कृत योजना आहे, ज्यामध्ये २ लाख रुपयांचा आयुर्विमा मिळतो. दरवर्षी ३३० रुपये किंवा दरमहा  २७.५० रुपये एवढा कमी प्रिमियम भरावी लागणारी ही आयुर्विमा योजना १८ ते ५० वर्षे वयोगटातील लोकांसाठी आहे. पीएमएसबीवाय सारखाच, या योजनेचा लाभही नेटबँकिंग मार्फत घेता येऊ शकतो आणि ही रक्कम तुमच्या खात्यामधून आपोआप डेबिट होते. विमा असलेल्या व्यक्तीचे वय ५५ वर्षे झाले, की योजना संपुष्टात येते.

पब्लिक प्रोव्हिडंट फंड दरवर्षी ५०० रुपये :

हा छोट्या बचती करण्यासाठीचा एक लोकप्रिय गुंतवणूक आणि कर बचतीचा पर्याय आहे. तुम्ही तुमचे पीपीएफ खाते रु १०० च्या किमान गुंतवणुकीसह उघडू शकता, आणि दरवर्षी ५०० ते १.५ ला रुपयांपर्यंतच्या गुंतवणुका त्यामध्ये करू शकता. परंतु, जर तुम्ही या फंडामध्ये दर आर्थिक वर्षाला १.५ लाखांहून जास्त गुंतवणूक केलीत, तर अतिरिक्त गुंतवणुकीवर कोणतेही व्याज मिळणार नाही. पीपीएफवरील व्याजदर शासनाद्वारे दर तिमाहीत ठरवला जातो. सध्या, पीपीएफचा दर ७.८ टक्के निश्चित केलेला आहे, जो दर वर्षी चक्रवाढीने गणला जातो.प्राप्तिकराच्या कलम ८०क अंतर्गत, पीपीएफमधील १.५ लाखांपर्यंतची वार्षिक योगदाने कर सवलतीस पात्र असतात.

इक्विटी म्युच्युअल फंड एसआयपी दरमहा ५०० रुपये :

एसआयपी गुंतवणुका दीर्घ कालासाठी आकर्षक परतावे देतातच, पण तुमचा वृद्धपकाळही सुरक्षित करतात. यासाठी तुम्हाला केवळ एका प्रतिष्ठित म्युच्युअल फंड हाउसमध्ये नोंदणी करण्याची गरज आहे.

अटल पेन्शन योजना दरमहा ४२ रुपये :

या योजनेचे लक्ष्य समाजातील आर्थिकदृष्ट्या अक्षम असणाऱ्या लोकांना त्यांच्या वृद्धापकाळासाठी बचत करण्यास प्रोत्साहन देणे आणि खात्रीशीर दीर्घकालीन पेन्शन रक्कम मिळवून देणे हे आहे. तुम्ही एकदा या योजनेमध्ये गुंतवणूक केलीत, की तुम्हाला वयाच्या ६०व्या वर्षानंतर, तुमच्या योगदानानुसार आणि मुदतीनुसार ठरावीक रक्कम पेन्शन म्हणून मिळू लागेल. तुम्ही या योजनेमध्ये वयाच्या १८ व्या वर्षीपासून गुंतवण्यास सुरुवात करू शकता आणि वयाच्या ६०व्या वर्षीपर्यंत पैसे गुंतवू शकता. या योजनेचे मासिक योगदान दरमहा  केवळ ४२ रुपये इतकेच देणे आवश्यक आहे. तुम्हाला मुदतीच्या अखेरीस पेन्शनची रक्कम म्हणून रु १००० मिळतील. निवडलेल्या योजनेनुसार प्रिमियम क्रमश: वाढत जाईल.

या सर्व योजना तुम्हाला कमी किंमतीमध्ये तुमचे भविष्य सुरक्षित करण्यास मदत करत असल्याने, तुमच्या गरजांनुसार सर्वोत्तम योजना निवडा.

आदिल शेट्टी, कार्यवाह, बँकबाजार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2017 5:14 pm

Web Title: important investment plans in less amount you can save more
Next Stories
1 ‘हे’ व्हिटॅमिन्स केस वाढण्यास उपयुक्त 
2 ‘हे’ आहेत बडीशेप खाण्याचे फायदे
3 फेसबुकवरही आता करता येणार ‘स्नूझ’
Just Now!
X