11 December 2017

News Flash

ऑनलाईन व्यवहार करताना ‘ही’ काळजी घ्यायला हवी

सुरक्षेसाठी आवश्यक

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 3, 2017 3:07 PM

नोटाबंदीनंतर ऑनलाईन व्यवहारांना मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. यामुळे काळ्या पैशावर चाप बसला असल्याचेही म्हटले जात आहे. सध्या खरेदी, रेल्वे बुकिंग, चित्रपटाचे तिकीट काढणे किंवा इतर अनेक व्यवहार ऑनलाईन करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र तांत्रिक गोष्टींची योग्य ती माहिती नसल्याने किंवा तंत्रज्ञानाला मर्यादा असल्याने या व्यवहारांच्या सुरक्षेबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ती न घेतल्यास काही वेळा आपल्या अकाऊंटवरुन अचानक पैसे खर्च झाल्याची किंवा अकाऊंटचा गैरवापर झाल्याच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. आता काळजी घ्यायची म्हणजे नेमके काय करायचे हे समजून घेऊया…

१. सर्चिंग करताना सावधान

आपण इंटरनेटवर जे काही सर्च करतो ते आपल्या लॅपटॉप किंवा मोबाईलच्या हिस्टरीमध्ये सेव्ह राहते. मात्र यामध्ये काहीवेळा अशा लिंक्स उघडतात ज्या मालवेअर किंवा संशयास्पद असतात. अशाप्रकारे कोणत्या लिंक्स सुरु झाल्या असतील तर ऑनलाइन पेमेंट करताना तुमचा सुरक्षित डेटा चोरला जाण्याची शक्यता असते.

२. क्लिक करण्याऐवजी टाईप करा

आपण कोणतीही वेबसाईट शोधायची असल्यास काही अक्षरे टाईप करतो. त्यानंतर लगेचच त्याच्याशी निगडीत लिंक्स येतात. मात्र आपण कोणताही आर्थिक व्यवहार करत असू तर त्यावेळी या खाली आलेल्या लिंक्सवर क्लिक न करता आपल्याला जे हवे आहे ते स्वतंत्रपणे टाईप करावे. याशिवाय ‘https’ असे टाईप करणे महत्त्वाचे असते. यात s महत्त्वाचा असतो कारण त्यामुळे तुम्हाला सुरक्षित साईट दिसते.

जिओ फोनला टक्कर देणार ‘या’ टेलिकॉम कंपन्या

३. लॅपटॉप वापरा

अनेकदा आपण घाईमध्ये असताना मोबाईलवरुन आर्थिक व्यवहार करतो. मात्र त्यामध्ये गडबड होण्याची शक्यता असते. तसेच ऑफिसचे काम करताना किंवा सोशल नेटवर्किंग साईटसवर सर्फिंग करताना आपण अशाप्रकारचा व्यवहार केल्यास तो धोक्याचा ठरु शकतो. त्यामुळे आर्थिक व्यवहार आपण शांत असतानाच करावा. तसेच यासाठी वेगळा लॅपटॉप वापरल्यास जास्त उत्तम.

४. पासवर्ड मॅनेजर वापरणे आवश्यक

पासवर्ड मॅनेजर आपल्याला विविध अकाऊंटस मॅनेज करण्यास मदत करतो. यामुळे आपल्याकडून होणाऱ्या चुकांपासून आपण वाचू शकतो. अनेकदा जास्त पासवर्ड लक्षात रहात नाहीत म्हणून एकच पासवर्ड सगळ्या अकाऊंटसला ठेवला जातो. मात्र हे अतिशय चुकीचे असून पासवर्ड मॅनेजर या चुकीपासून आपल्याला वाचवू शकतो.

५. सार्वजनिक वायफाय आणि कॉम्प्युटर वापरु नका

तुम्ही तुमचा वैयक्तिक आर्थिक व्यवहार करत असाल तर सार्वजनिक वायफाय किंवा कॉम्प्युटर वापरु नका. यामध्ये हॅक होण्याची शक्यता असल्याने ते असुरक्षित असते. याशिवाय आपले लॉगइन आणि पासवर्ड यामध्ये चोरला जाण्याचीही शक्यता असते. त्यामुळे आर्थिक व्यवहार हे आपल्या वायफायवर तसेच कॉम्प्युटरवरच करावेत.

First Published on October 3, 2017 2:29 pm

Web Title: important tips during online payment keep your bank account safe