वजन कमी करणे ही प्रक्रिया वाटते तितकी सोपी नाही, त्या व्यक्तीसाठी ती आव्हानात्मक गोष्ट असते. सध्या वाढते वजन ही एक मोठी समस्या झाली असून वजन घटवायच्या नादात आपण अनेक चुकीच्या गोष्टी करुन बसतो. यामुळे आपले वजन तर कमी होत नाहीच पण त्याचा आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. तसेच वजन कमी करण्यासाठी जेव्हा तुम्ही शॉर्टकट वापरता तेव्हा त्याचा अजिबातच उपयोग होत नाही. याचे कारण म्हणजे आपल्याला वजन कमी कसे करायचे याबाबत योग्य ती माहिती नसते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी चुकीचे प्रयोग करण्यापेक्षा योग्य ती माहिती घेऊन उपाय करणे आवश्यक आहे. पाहूयात अशाच काही चुका ज्या अनेकांकडून सहज होऊन जातात…

१. अति प्रमाणात व्यायाम करणे – दररोज न चुकता व्यायाम करणे आरोग्यासाठी आवश्यक असते. मात्र हा व्यायाम योग्य त्या प्रमाणात आणि योग्य मार्गदर्शनाखाली करणे आवश्यक आहे. अनेकांकडून वजन कमी करण्याच्या नादात शरीराला झेपणार नाही इतका व्यायाम केला जातो. याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. इतकेच नाही तर अशा अती व्यायाम केल्याने मनावरही ताण येतो.

२. चुकीची आहारपद्धती अवलंबणे – सध्या आपल्यावर विविध माध्यमातून माहितीचा बढीमार होत असतो. यामध्ये इंटरनेटचा वाटा सर्वात जास्त आहे. मात्र इंटरनेट किंवा इतर ठिकाणी सांगण्यात येणाऱ्या आहाराच्या टिप्स या सर्वांसाठी समान असतीलच असे नाही. तर प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, त्यामुळे आपली प्रकृती लक्षात घेऊन त्याप्रमाणेच डाएट करावे.

३. दिर्घकाळ भुकेले राहणे – तुमचे वजन जास्त आहे म्हणून तुम्ही भूक मारणे हा त्यावरचा उपाय होऊ शकत नाही. वजन वाढत असल्यामुळे लोक विशेषत: महिला कॅलरीज कमी करण्याच्या नादात भुकेले राहण्याला पसंती देतात. यामुळे आरोग्याच्या इतर तक्रारी उद्भवतात आणि मेटाबॉलिझम कमी होत जातो. त्यामुळे वजन घटविण्याची प्रक्रिया अशी अवघड करुन ठेऊ नका.

४. शॉर्टकटचा वापर करणे – वजन कमी करणे ही ठराविक काळाची प्रक्रिया आहे. त्यामुळे कमी वेळात काहीतरी उपाय करुन ती साध्य होईल हा विचार चुकीचा ठरु शकतो. कोणत्याही गोष्टीत शॉर्टकट वापरणे फायद्याचे नसतेच. त्याचप्रमाणे वजन कमी करण्यासाठी स्लिमिंग बेल्टस वापरणे तसेच गोळ्या घेणे अयोग्य आहे.

५. अपुरी झोप – झोप ही उत्तम आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. वजन कमी करण्यामध्येही झोपेचा मोठा वाटा आहे. तुम्हाला दिवसाला पुरेशी म्हणजेच किमान ७ ते ८ तासांची झोप मिळत नसेल तर वजन कमी होत नाही.