व्यायाम हा उत्तम आरोग्यासाठी गरजेचा असतो हे आपल्याला माहित आहे. मात्र हा व्यायाम करण्याच्या काही विशिष्ट पद्धती आणि नियम आहेत. आरोग्य चांगले ठेवायचे असल्यास काही ध्येयांची निश्चिती करणे आणि त्यादिशेने वाटचाल करणे आवश्यक आहे. काही लोक आपले वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतात तर काही वजन वाढविण्यासाठी व्यायामाचा आधार घेतात. पण रिकाम्या पोटी व्यायाम करणे आरोग्यासाठी चांगले नसते त्यामुळे व्यायामाआधी पोटात काहीतरी असायला हवे. स्नायूंना बळकटी यायची असेल आणि शरीराची ताकद वाढायची असेल तर व्यायामाआधी काय खाल्लेले चांगले याविषयी…

तुमची शरीरयष्टी लक्षात घ्या

प्रत्येकाची शरीरयष्टी वेगळी असते. त्यानुसार आपल्याला उपयुक्त असलेला आहार घेणे आवश्यक आहे. अशावेळी तुमचा स्वत:चा डाएट प्लॅन फॉलो करणे केव्हाही चांगले. तुम्हाला ताकद मिळेल आणि तुमच्या आरोग्याला योग्य असेल असाच आहार व्यायामाआधी घ्या.

कार्बोहायड्रेटस टाळू नका

अनेकदा लोक कार्बोहायड्रेटस आणि साखर टाळतात. मात्र त्यामुळे व्यायामाचा चांगला उपयोग होत नाही. त्यामुळे व्यायामाच्या आधी घेण्यात येणाऱ्या आहारात चांगल्या कार्बोहायड्रेटसचा वापर करा. याची स्नायूंमधील ऊर्जा टीकून राहण्यास मदत होते.

योग्य वेळ ठरवा

व्यायामाआधी खाल्ल्या जाणाऱ्या गोष्टींच्या वेळा अतिशय महत्त्वाच्या असतात. या वेळा पाळल्या नाहीत तर तुम्हाला व्यायामाचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. व्यायाम करायच्या एक तास आधी खाणे केव्हाही चांगले. कारण तुम्ही घेतलेले प्रोटीन पचायला बराच वेळ लागतो.

पाणी पिणे आवश्यक

शरीराला पाण्याची आवश्यकता असते. व्यायाम केल्याने घाम येतो आणि शरीरातील ऊर्जा खर्च होते. त्यामुळे शरीर हायड्रेट होऊ नये यासाठी व्यायामाआधी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.

रिकाम्या पोटी व्यायाम नको

साधारणपणे व्यायाम सकाळी केला जातो. रात्रभर आपले पोट रिकामे असते. त्यामुळे रिकाम्या पोटी व्यायाम केल्यास त्याचा त्रास होऊ शकतो. तसेच एरवीही भुकेल्या पोटी व्यायाम करणे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे योग्य तो आहार घेऊन मगच व्यायाम करा.