लठ्ठपणा ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे सध्या बहुतांश जणांसाठी पोटाचा वाढता घेर किंवा स्थूलपणा हा अनेकांसाठी चिंतेचा विषय आहे. पुरूष आणि महिला दोघांना या लठ्ठपणावर नेमके कोणते उपाय करता येतील याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. वाढलेली चरबी कमी करण्यासाठी कधी डाएट करणे तर कधी अचानक जीम जॉईन करणे असे उपाय अवलंबले जातात. मात्र याविषयी योग्य ती माहिती नसल्यास त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. रोजच्या धावपळीत व्यायामाला वेळ नाही अशी तक्रार अनेक जण करतात पण एकदम वाढलेल्या वजनाचे आणि लठ्ठपणाचे टेन्शन आले की व्यायाम सुरु केला जातो. आता अचानकपणे व्यायाम सुरु करत असाल तर काही गोष्टींची माहिती असायलाच हवी. पाहूयात वाढलेली चरबी घटविण्यासाठी व्यायामाला सुरुवात करताना काय काळजी याविषयी मानसी जैन यांनी सांगितलेल्या टीप्स…

१. तुम्ही लठ्ठ आहात असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला चांगल्या फिटनेस प्लॅनची आवश्यकता आहे. तुम्ही स्वत:ला थोडे प्रोत्साहीत केले तर तुम्ही व्यायामाला नक्कीच सुरुवात करु शकता.

२. चालण्यापासून सुरुवात करा. त्यामुळे तुमच्या शरीराची किमान हालचाल सुरु होईल. सुरुवातीला आहे त्या परिस्थितीपेक्षा शरीराची हालचाल १० टक्क्यांनी वाढणेही उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असते.

३. साधारण २ ते तीन आठवडे चालणे नियमित झाल्यावर स्ट्रेचिंग आणि पायांचे व्यायाम करण्यास सुरुवात करावी. स्क्वाटस, प्लँकस, पुशअप आणि स्क्विझ इ. केल्यामुळे तुमची चरबी घटण्यास मदत होईलच त्याशिवाय तुम्हाला व्यायाम करण्यात मजा यायला सुरुवात होईल.

४. आता चालणे आणि इतर व्यायाम सुरु झाल्यानंतर तुम्ही कार्डिओ वर्कआऊट वाढविणे गरजेचे आहे. यासाठी जंपिंग जॅक आणि सिटींग जॅक करायला सुरुवात करा.

५. याशिवाय धावणे आणि जॉगिंग करणे हाही उत्तम व्यायाम असून वजन कमी करण्यासाठी त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. पण हे सगळे टिकवून ठेवण्यासाठी प्रेरणा आणि सातत्य गरजेचे असते.

६. एकट्याने व्यायाम सुरु करण्यापेक्षा तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रिण यांच्याबरोबर व्यायाम सुरु करा. एकमेकांच्या सोबतीने व्यायामात सातत्य राहण्यास मदत होईल.

७. सुरुवातीला कोणताही व्यायाम करत असाल तरी त्याचा कालावधी २० मिनीटांपेक्षा जास्त ठेऊ नका. नाहीतर विनाकारण खूप दमणूक होईल आणि तुम्ही व्यायाम टाळू लागाल. काही काळ २० मिनीटे व्यायाम केल्यानंतर कालावधी हळूहळू वाढवत न्या.

८. वजन वाढले म्हणून अजिबात उपाशी राहू नका. पौष्टीक आहार घ्या आणि शरीरात जास्तीत जास्त पाणी आणि द्रव पदार्थ जातील याचा प्रयत्न करा. त्याबरोबरच आहारातील साखर आणि गोड पदार्थांचे प्रमाण कमी करा.

९. तुम्ही नियमित जिमला जाणारे नसाल तर चालणे आणि धावणे सोडून इतर व्यायाम तुम्ही घरच्या घरी करु शकता. त्याबरोबरच झुंबा, योगासने, अॅरोबिक्स यांसारखा व्यायामही तुम्हाला वजन घटविण्यासाठी उपयुक्त ठरु शकतो.