गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स जिओमध्ये मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक सुरू आहे. तर दुसरीकडे रिलायन्स जिओ IPO आणण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच रिलायन्स जिओनं याच वेगानं प्रगती केली तर पुढील तीन वर्षांमध्ये रिलायन्स जिओ ५० कोटी ग्राहकांचा टप्पा गाठण्याची शक्यता वर्तवण्यात य़ेत आहे. बर्न्‍सटेन रिसर्चनं आपल्या अहवालात याबाबत माहिती दिली आहे.

रिलायन्स जिओ ही कंपनी भारतीय टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी ठरत असल्याचं डिसेंबर महिन्याच्या अपडेटमध्ये म्हटलं होतं. यापूर्वी सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आम्ही अनेक परदेशी कंपन्यांनाही रिलायन्स जिओ या कंपनीत गुंतवणूक करताना पाहिलं आहे. परदेशी कंपन्यांनाही जिओमध्ये आशा दिसत आहे. तसंच याची सुरूवात फेसबुकपासून झाली आहे. सर्वप्रथम फेसबुकनं जिओमध्ये ४३ हजार ५७३.६२ कोटी रूपयांची गुंतवणूक केली होती. तसंच कंपनीतील ९.९९ टक्के हिस्सा विकत घेतला होता, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. यानंतर ८ खासगी गुंतवणुकदारांनी ६० हजार ७५३.३३ कोटी रूपयांची गुंतवणूक केली. जिओमध्ये ८ आठवड्यांमध्ये १.०४ लाख कोटी रूपयांची गुंतवणूक आली. यामोबदल्यात जिओनं २२ टक्क्यांपेक्षा अधिक हिस्सा विकला असल्याचंही अहवालात म्हटलं आहे.

बर्न्‍सटेन रिसर्चनं सादर केलेल्या अहवालात पुढील काही वर्षांच्या आत मुकेश अंबानी रिलायन्स जिओसाठी आयपीओ आणू शकतील, असं म्हटलं आहे. तसंच तो पर्यंत रिलायन्स जिओच्या आरपूमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. तर पुढील तीन वर्षांमध्ये रिलायन्स जिओचा महसूल वाढून दुप्पट होणार आहे. तर काही दिग्गज कंपन्यांची नजरही जिओवर आहे. तसंच यापुढेही रिलायन्स जिओमध्ये मोठी गुंतवणूक होऊ शकते. या पैशाचा वापर रिलायन्स इंडस्ट्रिजला कर्जमुक्त करण्यासाठी होऊ शकतो, असंही अहवालात सांगण्यात आलं आहे.

२०२३ पर्यंत ५० कोटी ग्राहक

बर्न्‍सटेनच्या अंदाजानुसार २०२२-२३ पर्यंत जिओच्या ग्राहकांच्या संख्येत वाढ होऊन ती ५० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २०१९-२० मध्ये ही संख्या ३८.८ कोटी होती. तर २०२४-२५ मध्ये ती वाढून ५६.९ कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुरू आर्थिक वर्षात जिओचा बाजारातील वाटा वाढून ४० टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. गेल्या आर्थिक वर्षांमध्ये तो ३६ टक्के होता. तर २०२४-२५ पर्यंत वाढून तो ४८ टक्क्यांवर जाणार असल्याचंही अहवालात म्हटलं आहे.