दिग्गज टेक कंपनी Google लवकरच टीव्ही सेगमेंटमध्ये शाओमी, सॅमसंग आणि सोनी यांसारख्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी नवीन स्मार्ट टीव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. अॅडव्हान्स युजर इंटरफेस(UI) आणि आधीपेक्षा चांगल्या ऑपरेटिंग सिस्टिमसह नवीन गुगल टीव्ही Google Android TV ची जागा घेईल असं समजतंय.

Gizchina च्या रिपोर्टनुसार, मार्च महिन्यात गुगलचा नवा टीव्ही लाँच होण्याची शक्यता आहे. हा टीव्ही सर्वप्रथम अमेरिकेत लाँच होईल, नंतर भारतासह अन्य देशांमध्ये लाँच केला जाईल. गुगलच्या नवीन टीव्हीमध्ये युजर्सना नवीन आणि अपग्रेडेड इंटरफेस मिळेल. हा टीव्ही अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टिमवर कार्यरत असेल. शिवाय हा टीव्ही दुसऱ्या स्मार्ट टीव्ही आणि सेट-टॉप बॉक्ससहीत अन्य डिव्हाइसोबत सहज कनेक्ट करता येईल. तसेच युजर्सनी आपल्या आवडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चॅनेल्स शॉर्टलिस्ट केल्यानंतर गुगल टीव्हीवर व्हॉइस कमांडच्या मदतीने आवडीचा सिनेमा किंवा शो बघता येईल. शिवाय गुगल टीव्हीकडून नवीन शोबाबत सजेशनही युजर्सना मिळेल.

सध्या गुगल टीव्हीवर Disney + Hotstar, Netflix आणि YouTube यांसारख्या प्लॅटफॉर्म्सचा सपोर्ट आहे. पण नवीन टीव्हीसोबत अजून काही ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा इन-बिल्ट सपोर्ट मिळू शकतो. गुगलच्या या नवीन टीव्हीची किंमत किती असेल याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.