पाऊस म्हटलं की पाठोपाठ आजारपण येतंच. त्यातही लहान मुलांना लगेच. आता पाऊस तर किमान पुढचे ३ महिने येणार आहे. मग आपणच आपली काळजी घेतली तर या आजारपणाचे प्रमाण काही प्रमाणात कमी करता येऊ शकते. या वातावरणात साथीचे रोग आणि ऍलर्जी याचे प्रमाण जास्त असते. आता साथीचे रोग म्हणचे सर्वात आधी आपल्यावर अतिक्रमण करते ती सर्दी आणि खोकला.

* सर्दी-खोकल्यासाठी कमी करण्यासाठी आहारात रोज ‘क’ आणि ‘अ’ जीवनसत्व तसेच प्रथिने असणे गरजेचे आहे. या गोष्टींचा आहारात समावेश असेल तर प्रतिकार शक्ती चांगली राहते आणि संसर्ग झाला तरीही त्याचे प्रमाण आणि तीव्रता कमी राहते. हीच प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी आहारात कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाणही चांगले असणे गरजेचे आहे.

* पावसाळा म्हटल्यावर भिजणे होणारच मात्र डोक्यात पावसाचे पाणी मुरणार नाही याची काळजी घ्यायला हवी. थंड हवे मध्ये कानाला वारे लागेल असे किंवा जास्त भिजणे होणार नाही याची काळजी घ्यावी. गरम पाणी पिणे, वाफ घेणे यांमुळे सर्दीला आराम पडू शकतो.

* पावसाळ्यात स्वच्छता पाळणे अतिशय महत्वाचे आहे. परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. पाणी साचता कामा नये. साचलेलं पाणी डासांच्या वाढीसाठी अतिशय पोषक असल्याने डास वाढण्याची शक्यता असते. मुलांना खेळायला पाठवतानाही कुठे खेळतात यावर लक्ष असावे. कारण गवत, डबकी अशा ठिकाणी डास जास्त प्रमाणात असतात.

* बाहेर हवा गार असले तर शरीरातील उष्णता वाढल्या सारखी वाटून या वातावरण बदलाच्या वेळी उष्णतेचा त्रास होतो. पावसाळ्यात पाणी कमी प्यायले जाते आणि चहा कॉफी जास्त होते. तर पावसात देखील दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी प्यायला हवे. चहा कॉफी ऐवजी वेगवेगळी सूप पिण्याची सवय ठेवल्यास ते आरोग्यास अधिक चांगले ठरु शकते. पाकीट बंद किंवा चायनीज सूपपेक्षा घरात केलेले सूप जास्त चांगले. सर्दी खोकला झाला तरी चांगला फायदा होतो व पाणी देखील आपोआप पोटात जाते.

* पावसाळ्यात बाहेर फिरायला जाण्याचे प्रमाण जास्त असते. पावसात बाहेरचे पाणी पिल्याने आजारी पडण्याची भीतीदेखील असते. तर बाहेर खाता पिताना उकळी आलेलेच अन्नपदार्थ घेणे उत्तम. शक्यतो बाहेरची चटणी, कोरडे सॅन्डविच टाळावे. यातून संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे गरम पदार्थ किंवा पेय घेणे केव्हाही उत्तम