अमेरिकेतील संशोधकांचा निष्कर्ष; ६५ वर्षांनंतरही काम केल्यास आरोग्य चांगले
व्यक्ती सर्वसाधारणपणे ५८ व्या वर्षी निवृत्त होतात. मात्र ६५ वर्षांनंतर काम करत राहिल्याने दीर्घायुष्य मिळते, असे एका अभ्यासांती स्पष्ट झाले आहे. ओरॅगोन विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत अभ्यास केला असून, ६५ व्या वर्षांनंतरच्या निवृत्त व्यक्तीवरून हे निष्कर्ष निघाले. ज्या व्यक्ती स्वत:ला अशक्त मानतात, त्यांनीही दीर्घकाळ काम केल्यास त्यांचे आयुष्य वाढते. प्रत्येकाला हे सूत्र लागू होत नाही. मात्र सतत कामात राहिल्याने आर्थिक व सामाजिक फायदे मिळतात. त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असे विद्यापीठातील चेंकई वु यांनी स्पष्ट केले. निवृत्ती लांबणीवर टाकणे हे बऱ्याच प्रमाणात आर्थिक बाबींशी निगडित असते. मात्र आरोग्यविषयक बाबींचाही विचार व्हायला हवा, असे त्यांनी सांगितले.
त्या दृष्टीने १९९२ ते २०१० या कालावधीत सेवानिवृत्तांचा आरोग्यविषयक तपशील गोळा करण्यात आला. एकूण बारा हजार जणांपैकी २९५६ जणांवर लक्ष्य केंद्रित करण्यात आले. त्यात आरोग्यविषयक तक्रारींचे एक कारण लवकर सेवानिवृत्तीत होते. याला पर्याय काय हे संशोधकांपुढील आव्हान होते. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी असलेल्या व्यक्तींची वर्गवारी करण्यात आली. अभ्यासाच्या कालावधीत १२ टक्के सशक्त, तर जवळपास २५.६ टक्के आरोग्याच्या तक्रारी असलेले निवृत्त दगावले. शिक्षण, आर्थिक संपन्नता व जीवनशैलीचा परिणाम या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करत असल्या तरी, सर्व पैलूंचा विचार केल्यावर दीर्घकाळ कार्यरत राहिलेल्यांचे आरोग्य उत्तम राहते, असे संशोधक रॉबर्ट स्टेवस्की यांनी सांगितले.