कार्यालय अथवा कंपनीत काम करताना झालेल्या दुखापतींमुळे महिलांमध्ये नैराश्य, चिंता आणि थकवा या मानसिक आजारांचा धोका अधिक वाढत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे.

महिलांना घरकाम करताना दुखापत होण्याचा धोका पुरुषांच्या तुलनेत अधिक असतो. त्यामुळेच त्याचा महिलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. संशोधनानुसार कामगारांना अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी सामान्य सुरक्षा कार्यक्रमापेक्षा अधिक काहीतरी करणे आवश्यक आहे. सुरक्षा आणि आरोग्यासाठी एकत्रित दृष्टिकोन असणे आवश्यक असल्याचे अमेरिकेतील कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठातील साहाय्यक प्राध्यापिका नतालिया श्वातका यांनी म्हटले आहे.

वैद्यकीय विम्याच्या ३१४ दाव्यांचा संशोधकांनी अभ्यास केला. ‘ऑक्युपेशनल अँड एन्व्हायर्न्मेंटल मेडिसिन’ या मासिकात प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात १७ हजार कामगारांच्या आरोग्यावर अभ्यास करण्यात आला आहे. त्यात व्यवस्थापक ते कामगार पदावरील सर्वाचा समावेश आहे. कार्यालयात काम करताना दुखापत झाल्यास पुरुषांच्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होत नाही. मात्र, कार्यालयातील दुखापतींमुळे मानसिक आरोग्य बिघडल्याच्या तक्रारी महिलांकडून मोठय़ा प्रमाणावर आल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले. ६० टक्के महिलांनी दुखापतींनंतर मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याच्या तक्रारी केल्या. त्याच वेळी पुरुषांमध्ये हे प्रमाण ३३ टक्के होते.

कामातील दुखापतींचा महिलांच्या आरोग्यावर अधिक परिणाम का होतो, याचा अभ्यास संशोधकांनी सुरू केला आहे. कार्यालय आणि घरातही काम करावे लागत असल्यामुळे महिलांमध्ये तणाव वाढत असून मानसिक आरोग्य ढासळत असल्याची शक्यता श्वातका यांनी व्यक्त केली.