भारत सरकारची चिनी कंपन्यांविरोधात कारवाई सुरूच आहे. आता सरकारने चिनी सर्च इंजिन Baidu आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo भारतात बॅन केले आहेत. ब्लॉक करण्यात आलेल्या या दोन्ही अ‍ॅप्सचा समावेश चीनमधील सर्वाधिक लोकप्रिय अ‍ॅप्समध्ये होतो.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना (IPSs)Baidu आणि Weibo हे दोन्ही अ‍ॅप्स ब्लॅक करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय, गुगलच्या प्ले-स्टोअर आणि अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरमधूनही हे अ‍ॅप्स हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर पंतप्रधान नरेंद्र मोदींचंही अकाउंट होतं. मात्र लडाख सीमेवरील धुमश्चक्रीनंतर भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोदींनी हे अकाउंट बंद केलं होतं.

५९ चिनी अ‍ॅप्स बॅन केल्यानंतर २७ जुलै रोजी सरकारने अजून ४७ चिनी अ‍ॅप्स बॅन केल्याचं वृत्त आलं होतं. Baidu आणि Weibo हे दोन्ही अ‍ॅप्स त्या ४७ अ‍ॅप्सपैकी असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, नव्याने बॅन करण्यात आलेल्या ४७ अ‍ॅप्समध्ये बहुतांश ‘क्लोनिंग’ अ‍ॅपचा समावेश आहे. याशिवाय युजरची खासगी माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका यांच्या आधारे सरकार अजून काही चिनी अ‍ॅप्सवर कारवाई करण्याची शक्यता आहे.