हृदय, रक्तवाहिन्यांसंबंधी रोग आणि मधुमेह (एनसीडी) या असंसर्गजन्य रोगांमुळे २०१२-२०३० या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण पडणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला यामुळे ६.२ ट्रिलियन अमेरिकन डॉलरचा (६ लाख २० हजार कोटी रुपये) फटका बसणार असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात देण्यात आलेली आहे. या आजारांचा भारत आणि चीनमध्ये झपाटय़ाने प्रसार होत असल्याने संयुक्त राष्ट्रांनी धोक्याचा इशारा दिला आहे.
असंसर्गजन्य आजारांमुळे केवळ मानवी शरीराला भीती नसून त्याचा गंभीर परिणाम अर्थव्यवस्थेवरही होणार असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. जगभरातील शहरी आरोग्याबाबत हा अहवाल असून तो जागतिक आरोग्य संघटना आणि यूएन (मानवी वसाहत कार्यक्रम) यांनी संयुक्तरीत्या मांडला आहे.
शहरी भागातील जीवनमान, कामाची पद्धती यांमुळे हृदय, रक्तवाहिन्यांसंबंधी रोग आणि मधुमेह हे आजार झपाटय़ाने वाढत आहेत, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या आजारांचा परिणाम भारत आणि चीनच्या अर्थव्यवस्थेवर होणार हे निश्चित. २०१४ ते २०५० या कालावधीत चीनमध्ये २९.२ कोटी लोक शहरी भागात येतील. तर भारताची लोकसंख्या ४०.४ कोटींनी वाढणार आहे. त्यामुळे या दोन्ही देशांत शहरांतील लोकसंख्या वाढणार आहे. सामाजिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने भारत अस्थिर आहे. त्यामुळे या आजारांचा चीनला २७ लाख ८० हजार कोटी रुपयांचा (२७.८ ट्रिलियन अमेरिकन डॉलर) फटका बसणार आहे.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)