गतवर्षी जाहीर झालेल्या जागतिक भूक निर्देशांकाच्या (वर्ल्ड हंगर इंडेक्स) यादीत भारताची गणना अन्नसुरक्षेबाबत अत्यंत असमाधानकारक कामगिरी केलेल्या देशांत झाली. हे लक्षात घेता, भारतात अन्नाअभावी होणारे मृत्यू कमी करण्यासाठी सरकारने सर्वसमावेशक पोषण धोरण तयार करावे, अशी सूचना या क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली आहे.

जगभरात निकृष्ट आहारामुळे वर्षांला १.१ कोटींहून अधिक मृत्यू होतात, असे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात दिसून आले आहे. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या दी इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अ‍ॅण्ड इव्हॅल्यूएशनतर्फे हा अभ्यास करण्यात आला आहे.

लॅन्सेट पत्रिकेत एप्रिलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, भारतातही निकृष्ट, अपुऱ्या आहारामुळे दरवर्षी हजारो व्यक्तींचा मृत्यू होतो. या अभ्यासात १९५ देशांमध्ये आहारविषयक १५ घटकांचे कसे सेवन केले जाते, याची १९९० ते २०१७ या कालावधीतली माहिती तपासण्यात आली आहे. यात भारताचा क्रमांक ११८वा आला असून भारतात एक लाख लोकांमधील ३१० जणांचा आहाराअभावी मृत्यू होत असल्याचे नोंदविण्यात आले आहे.

आहारतज्ज्ञांच्या मते, आता सरकारने ग्रामीण तसेच शहरी भागातील लोकांनाही पोषण आहार कसा मिळेल, याकडे लक्ष दिले पाहिजे. याविषयी गुरुग्राम येथील पारस रुग्णालयातील वरिष्ठ तज्ज्ञ राजेश कुमार यांनी सांगितले की, भारतात योग्य पोषण धोरण तयार करण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. निकृष्ट आहारामुळे शरीराला जीवनसत्त्वे, प्रथिने, मेद, खनिजे आणि इतर सूक्ष्म पोषण द्रव्यांचा आवश्यक तेवढा पुरवठा होत नाही. त्यांची शरीरात कमतरता निर्माण होते. हे पोषक घटक आपणास हालचाल, काम करण्यासाठी ऊर्जा देतातच, शिवाय रोगप्रतिकारकशक्ती तयार होण्यासाठीही त्यांची गरज असते. त्यांच्या अभावामुळे मुले रोगांना बळी पडतात.