स्मार्टफोनची जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ या बाबतीत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ते सप्टेंबर २०१८ या तिमाहीमध्ये भारताने अमेरिकेला मागे टाकल्याचा अहवाल कॅनालिस या संस्थेने दिला आहे. या तिमाहीमध्ये भारतीय बाजारपेठेत दाखल झालेल्या स्मार्टफोन्सची संख्या ४.०४ कोटी इतकी होती. तर पहिल्या स्थानावर १०.०६ कोटींच्या स्मार्टफोनसह चीन पहिल्या स्थानावर आहे. याच कालावधीत अमेरिकी बाजारपेठेत दाखल झालेल्या स्मार्टफोन्सची संख्या ४ कोटी होती, त्यामुळे या कालावधीत झालेल्या स्मार्टफोन्सच्या विक्रीच्या बाबतीत भारताने अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. मात्र, स्मार्टफोन्सच्या खरेदीच्या बाबतीत चिनी बाजारपेठ भारतापेक्षा प्रचंड पुढे असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत जागतिक बाजारपेठांमध्ये मंदी आहे व जागतिक बाजारात स्मार्टफोन्सची एकूण उलाढाल घटली आहे. जुलै ते सप्टेंबर २०१८ या तिमाहीमध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत स्मार्टफोन्सची विक्री ७.२ टक्क्यांनी घटून ३४.८९ कोटी इतकी झाली आहे. गेले चार महिने स्मार्टफोन्सच्या विक्रीत सातत्यानं घट होत आहे, असे कॅनालिसनं आपल्या अहवालात नमूद केले आहे.

जगातल्या दहापैकी सात देशांमधील बाजारपेठांमध्ये स्मार्टफोन्सच्या विक्रीत घट झाली आहे व २०१५ नंतरची आत्तापर्यंतची ही सर्वात सुमार कामगिरी आहे. स्मार्टफोन बदलण्याचा कालावधी वाढल्यामुळे हे होत असल्याचे मत निरीक्षकांनी नोंदवले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये असलेल्या समस्या व बड्या चिनी उत्पादकांचं आव्हान यामुळेही बाजारावर परिणाम झाल्याचे कॅनालिसनं म्हटलं आहे.

ज्या तीन देशांमध्ये स्मार्टफोनच्या विक्रीत वाढ झाली आहे त्यामध्ये इंडोनेशिया (१३.२ टक्के वाढीसह ८९ लाख), रशिया (११.५ टक्के वाढीसह ८८ लाख) व जर्मनी (२.४ टक्के वाढीसह ५५ लाख) यांचा समावेश आहे. पहिल्या स्थानी असलेल्या चिनी बाजारपेठेतील मागणीही गेल्या वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत १५.२ टक्क्यांनी घटली तर भारतातली मागणी १.१ टक्क्यानं घटली आहे.

स्मार्टफोन उत्पादकांमध्ये सॅमसंग २०.४ टक्के बाजारातील हिश्शासह आघाडीवर आहे. त्यामागोमाग हुआवेई (१४.९ टक्के), अपल (१३.४ टक्के), शाओमी (९.६ टक्के) व ओप्पो (८.९ टक्के) या कंपन्या आहेत.