सध्या आपण डिजिटल इंडियाच्या दिशेनं पुढे जात असलो तरी मोबाईल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत मात्र आपण फार पिछाडीवर असल्याचं समोर आलं आहे. मोबाईल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारताला आता नेपाळ आणि पाकिस्ताननंही मागे टाकलं आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत मोबाईल स्पीडच्या क्रमवारीत भारताची घसरण झाली आहे. स्पीड टेस्ट फर्म Ookla ने जाहीर केलेल्या माहितीनुसार इंटरनेट स्पीडच्या ग्लोबल इंडेक्समध्ये भारत १३१ व्या क्रमांकावर आला आहे. कंपनीनं सप्टेंबर महिन्यातील इंटरनेट स्पीडनुसार हा क्रमांक जाहीर केला आहे.

Ookla नं दिलेल्या माहितीनुसार फिक्स्ड ब्रॉडबॅन्ड स्पीडच्या ग्लोबल इंडेक्समध्ये भारत ७० व्या क्रमांकावर आहे. एकीकडे मोबाईल इंटरनेट स्पीडच्या क्रमवारीत भारत ११९ वरून १२१ व्या क्रमांकावर पोहोचला आहे तर फिक्स्ड ब्रॉडबॅन्डच्या क्रमवारीत भारत गेल्या महिन्याच्या तुलनेत ७२ व्या क्रमांकावरून ७० व्या क्रमांकावर आला आहे. Ookla नं जाहीर केलेल्या माहितीनुसार भारतात इंटरनेटचा सरासरी डाऊनलोड स्पीड १२.०७ एमबीपीएस होता. तर फिक्स्ड लाईन ब्रॉडबॅन्डचा सरासरी डाऊनलोड स्पीड ४६.४७ एमबीपीएस होता.

मोबाईल इंटरनेट ग्लोबल स्पीड इंडेक्समध्ये पाकिस्तान आणि नेपाळनंही भारताला पछाडलं आहे. परंतु फिक्स्ड लाईन ब्रॉडबॅन्ड स्पीडमध्ये मात्र भारत क्रमवारीत पाकिस्तानच्या पुढे आहे. Ookla स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्सनुसार सप्टेंबर महिन्यात जागतिक पातळीवर मोबाईल इंटरनेटचा सरासरी स्पीड ३२.६ एमबीपीएस इतका होता. परंतु भारतात तो १२.०७ एमबीपीएस इतका राहिला. १३८ देशांच्या यादीत भारत १३१ व्या क्रमांकावर गेला आहे. जागतिक पातळीवर मोबाईल इंटरनेटचा सरासरी अपलोड स्पीड हा ११.२२ एमबीपीएस इतका होता. परंतु भारतात तो ४.३१ एमबीपीएस इतका राहिला. Ookla ने दिलेल्या माहितीनुसार या क्रमवारीत दक्षिण कोरियानं पहिला क्रमांक पटकावला आहे. दक्षिण कोरियामध्ये सरासरी डाऊनलोड स्पीड हा १२१ एमबीपीएस इतका होता. तर ११३.३५ एमबीपीएस वेगासह चीन या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर संयुक्त अरब अमिराती, कतार आणि नेदरलँड या देशांनी अनुक्रमे तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक मिळवला आहे.