News Flash

डेंग्यूविरोधात भारताने ब्राझिलचे अनुकरण करावे

भारताने सर्वात जास्त मृत्यूसाठी कारणीभूत असलेल्या डेंग्यूच्या निर्मूलनासाठी करावे

| March 10, 2016 01:38 am

‘आयएमए’चे आवाहन
ब्राझिलमधील ‘झिका’ रोगजंतू प्रादुर्भावाविरोधातील जनजागृतीच्या प्रयत्नांचे अनुकरण भारताने सर्वात जास्त मृत्यूसाठी कारणीभूत असलेल्या डेंग्यूच्या निर्मूलनासाठी करावे, असे आवाहन भारतीय आरोग्य संस्था (आयएमए)ने केले आहे.
देशात आरोग्यरक्षणार्थ केले जाणारे प्रयत्न मर्यादित स्वरूपाचे असल्यामुळे अन्य विकसित देशांच्या तुलनेत डेंग्यूचा प्रादुर्भाव अधिक आहे. मागील वर्षी एकटय़ा दिल्लीतच ९७ हजार ७४० डेंग्यू झालेल्या रुग्णांची विक्रमी नोंद झाली असून त्यानंतर मृत्यू झालेल्यांची संख्या दोनशे असल्याचे आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एस. अग्रवाल यांनी सांगितले.
ब्राझिलकडून झिकाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू केलेल्या जनजागृती मोहिमेचे अनुकरण भारताने डेंग्यूच्या विरोधात करावा, असे आयएमएने सुचविले असून शिक्षण आणि जागरूकता उभारणे हा त्यांचा अविभाज्य भाग आहे. यासाठी सरकार आणि सशस्त्र दलाच्या सहकार्यातून डेंग्यूविरोधात समाजाला जागरूक करताना त्याची कारणे, परिणामांसोबतच अत्यावश्यक उपाय यांची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
आयएमएचे सरचिटणीस के.के.अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, डेंग्यूचा प्रसार हे एक प्रकारचे घटनाचक्र असून डेंग्यू झालेल्या व्यक्तीला चावलेला बाधित डास दुसऱ्या निरोगी व्यक्तीला चावल्याने त्यांचा प्रसार होत असतो. त्यामुळेच प्रवासातून आजाराचा प्रसार होत असल्याने गेली अनेक वर्षे पर्यटकांचे आकर्षण असलेली देशाची राजधानी दिल्लीसाठी ही चितेंची बाब आहे. ब्राझिलने दोन दक्षलक्ष सशस्त्र दलाला ‘झिका’ आजाराविरोधात तैनात केले आहे. त्याच्यांसोबत डास प्रतिबंध पथके आणि समाज मदत सदस्य नियुक्त केले असून त्याच्यामार्फत नागरिकांना घराशेजारी असलेल्या डासांच्या उत्पत्ती ठिकाणांना नष्ट करण्याचे मार्गदर्शन केले जात आहे. तसेच या समूहाच्या माध्यमातून ३५० शहरांतील ३० लाख लोकांपर्यंत ‘स्पष्टीकरणात्मक पत्रकांच्या’ माध्यमातून पोहोचण्याचे महत्त्वाकांशी आव्हान असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.
अग्रवाल यांच्या मते, २०१० पासून देशातील डेंग्यूची पाळेमुळे खोदून काढण्यात भारताला आलेले अपयश धोक्याची घंटा आहे. त्यामुळे या वर्षी भारतातील किमान एका तरी राज्याने अशा प्रकारची मोहीम हाती घेऊन ‘एडीस’ डासाच्या विरोधात युद्ध पुकारण्याची आवश्यकता आहे.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 1:38 am

Web Title: india should follow brazil on dengue problem
Next Stories
1 अल्कोहोलचे नियंत्रित सेवन आरोग्यासाठी हितकारक
2 भाजीपालायुक्त आहार प्रोस्टेट कर्करोगावर परिणामकारक
3 स्मार्टफोनचा अतिरिक्त वापर धोकादायक
Just Now!
X