22 November 2017

News Flash

उदमांजराच्या विष्ठेतील बियांपासून तयार होते महागडी कॉफी, किंमत माहितीये?

किंमत ऐकून धक्का बसेल

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 12, 2017 5:03 PM

कॉफीची भारतातील किंमत ८ हजार रुपये किलो तर आखाती आणि युरोपीय देशांतील किंमत २० ते २५ हजार रुपये किलोच्या आसपास असेल. (छाया सौजन्य : catpoopcoffeeinc)

आजकाल कॉफीशिवाय आपलं पानच हलत नाही. वाईट मूडही फटक्यात ठीक करायचा असेल किंवा झोप घालवायची असेल तर एक कप कॉफी पुरेशी ठरते. कॉफीची निर्मिती आणि निर्यात करणारा भारत हा आशिया खंडातला तिसरा मोठा देश आहे. पण आता कॉफी निर्मितीमध्ये भारताने एका पाऊल पुढे टाकायचं ठरवलं आहे. तेव्हा लवकरच भारत जगातील सर्वात महागडी कॉफी निर्यात करणार आहे. या कॉफीची भारतातील किंमत ८ हजार रुपये किलो तर आखाती आणि युरोपीय देशांतील किंमत २० ते २५ हजार रुपये किलोच्या आसपास असेल.

आता तुम्हाला ही किंमत ऐकून धक्का बसला असेल. एवढी किंमत असण्यामागचं कारण काय असू शकतं? असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल. ही महागडी कॉफी उदमांजरच्या (civet cat) विष्ठेतील कॉफीच्या बियांपासून तयार केली जाते. हे वाचून तुम्ही नाक वगैरे मुरडलं असेल यात काहीच शंका नाही. पण ही कॉफी अशाच प्रकारे तयार केली जाते. उदमांजर कॉफीची फळं खातात. फळांचा गर ती सहज पचवते पण बिया मात्र उदमांजरांना पचवता येत नाही. तिच्या विष्ठेमार्फत बिया बाहेर फेकल्या जातात. उदमांजर कॉफीची तिचं फळं खाते जी चांगली आणि पिकलेली असतात, अशीही धारणा आहे. मांजरीच्या पोटात असलेल्या द्रव्यामुळे कॉफीच्या बियांची चव वाढवण्यास मदत होते.

वाचा : कॉफीमुळे मधुमेहापासून बचाव होण्यास मदत

तिची विष्ठा गोळा केल्यानंतर त्यातून बिया वेगळ्या केल्या जातात आणि त्यानंतर त्यापासून कॉफी तयार केली जाते. ‘कूर्ग कन्सॉलिडेटेड कमॉडिटिज’ या कॉफीची निर्मिती करत असून, ‘अॅनिमेन’ या ब्रँडखाली तिची विक्री होणार आहे. अनेक ठिकाणी उदमांजरांना पकडून त्यांना बळजबरीने कॉफीची फळं खाऊ घालण्याची सक्ती केली जाते. पण कुर्गमध्ये मात्र या प्राण्यांवर कोणतीही बळजबरी न करता नैसर्गिक मार्गानेचे तिची निर्मिती करण्यात येणार आहे.

First Published on September 12, 2017 4:40 pm

Web Title: india started producing the worlds most expensive civet coffee
टॅग Civet Coffee