भारतात शाळा आणि कॉलेजशिवायही विद्यार्थ्यांना ट्युशन लावली जाते. विद्यार्थ्यांना शाळेत किंवा महाविद्यालयात शिकवलेले समजले नसेल तर त्यांना ट्युशनचा फायदा होईल या विचाराने ही ट्युशन लावण्यात येते. भारतातील विद्यार्थ्यांचे अशाप्रकारे ट्युशनला जाण्याचे प्रमाण जगात सर्वात जास्त आहे. यामध्येही गणित विषयाला क्लास लावणारे सर्वाधिक आहेत असे एका अहवालातून समोर आले आहे. Cambridge International Global Education Census Report मध्ये हा निष्कर्ष काढण्यात आले आहे.

भारतातील एकूण विद्यार्थ्यांपैकी ७४ टक्के विद्यार्थी ट्युशनला जातात. तर शाळेत जाणाऱ्या मुलांपैकी ७२ टक्के मुले अभ्यासेतर उपक्रमांमध्ये सहभागी घेतात. यातही खेळांशी निगडीत गोष्टींचा समावेश कमी असल्याचे नोंदवण्यात आले आहे. यामध्ये शिक्षकांशी निगडीत एक बाबही समोर आली आहे. भारतीय शिक्षक विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वात जास्त वचनबद्ध असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. ही गोष्ट भारतीय शिक्षकांच्यादृष्टीने अतिशय उत्साहवर्धक आहे. आपल्या देशातील पालक आपल्या मुलांच्या भविष्याबाबत विचार करण्यात सगळ्यात आघाडीवर असतात. ६६ टक्के पालक विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी झटत असतात.

या सर्वेक्षणात १० देशांचा प्रामुख्याने विचार करण्यात आला. त्यामध्ये अमेरिका, पाकिस्तान, मलेशिया, दक्षिण अफ्रीका, अर्जेंटीना आणि भारत यांसह आणखी काही देशांचा समावेश होता. यासाठी भारतातील ३८०० विद्यार्थी आणि ४४०० शिक्षकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना एक प्रश्नावली देण्यात आली होती. त्यात तंत्रज्ञान, करियर, इतर उपक्रमात गेलेला वेळ, कलाकुसर, खेळ, घरचा अभ्यास आणि इतर कोर्सेस यांविषयी प्रश्न विचारण्यात आले होते. शाळा किंवा महाविद्यालयाव्यतिरिक्त ट्युशन लावणाऱ्यांमध्ये चीनचा दुसरा क्रमांक लागतो.

तर भारतात वैद्यकीय आणि अभियांत्रिकी या शाखांना करीयरसाठी प्राधान्य देण्याचे प्रमाण आजही जास्त आहे. तर भारतातील ८ टक्के विद्यार्थी संशोधक होऊ इच्छितात आणि १६ टक्के विद्यार्थी सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि डेव्हलपर होतात. तर विषयांच्या बाबतीत भारतीय विद्यार्थी इंग्रजी विषयाला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचे समोर आले आहे. त्याखालोखाल ७८ टक्के मुलांना गणित शिकायला आवडते. ४७.८ टक्के विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सायन्स आवडते. असे असताना खेळांच्या बाबतीत मात्र अतिशय उदासिन अवस्था आहे. ३६.७ टक्के मुले अतिशय प्रयत्नांनी दिवसभरात १ तास खेळू शकतात. तर २६.१ टक्के मुले शाळेत कोणताच खेळ खेळत नाहीत.