भारतीय नौदलात २ हजार ७०० पदांसाठी मोठी भरती करण्यात येणार आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नौदलात कार्यालयीन कामकाज करण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, इच्छुकांना १८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील, अशी माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे. नौदलातील जवानांना विविध वस्तू पुरविण्यासह कार्यालयीन कामाकाजासाठी ही पदे भरण्यात येणार आहेत.

आर्टिफिशिअल अॅप्रेंटिस विभागात ५००, तर वरिष्ठ माध्यमिक भरती विभागात २ हजार २०० पदं भरण्यात येणार असल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली. तसंच ऑगस्ट २०२० च्या तुकडीसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आर्टिफिशिअल अॅप्रेंटिस विभागात २०, तर वरिष्ठ माध्यमिक भरती विभागात १५ वर्षांसाठी या नियुक्ती करण्यात येणार आहेत. दरम्यान, लेखी परीक्षेनंतर उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेण्यात येणार आहे. तसंच ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना नौदलाच्या देशभरातील कार्यालयांमध्ये नियुक्ती दिली जाईल.

दरम्यान, यासाठी ऑनलाइन पद्धतीनं परीक्षा घेण्यात येणार आहे. तसंच १४ हजार ६०० रुपये आणि इतर भत्ते देण्यात येणार आहेत. दरम्यान, अधिक माहितीसाठी https://www.joinindiannavy.gov.in/ या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन नौदलामार्फत करण्यात आले आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात या परीक्षा घेण्यात येणार असून उमेदवारांना ईमेल आणि संकेतस्थळाद्वारे याबाबतची माहिती कळवण्यात येणार आहे.