इटालियन मोटारसायकलची प्रसिद्ध कंपनी असलेल्या बेनेली कंपनीने आपली अनोखी अशी स्कूटर नुकतीच बाजारात दाखल केली आहे. ही स्कूटर लवकरच भारतात येण्याचीही शक्यता आहे. भारतात मोटारसायकलच्या क्षेत्रात २०१६ मध्ये डीएसके मोटारव्हील्ससोबत कंपनीने भारतात आगमन केले होते. आपल्या इतर उत्पादनांबरोबरच कंपनी लवकरच भारतात आपली स्कूटर लाँच करण्याची शक्यता आहे.

याआधी कंपनीने TNT 300, TNT 600 i, 600 GT, TNT 899, फ्लॅगशिप TNT R या गाड्या भारतीय बाजारपेठेत दाखल केल्या होत्या. या सर्व बाईक्स जास्त किंमतीच्या असून आतापर्यंत १८ महिन्यात कंपनीने आपल्या ३ हजार गाड्या विकल्या आहेत. आतापर्यंत भारतीय ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळेच आताही बेनेली कंपनी आपली नव्याने येणारी स्कूटर भारतीय बाजारपेठेत आणण्याचा विचार करत आहे. जे मॉडेल नव्याने बाजारात येणार आहे त्याचे सध्या टेस्टींग सुरु आहे.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार झॅफरानो २५० ही सध्या भारतात असणाऱ्या स्कूटरच्या तुलनेत मोठी आणि वजनदार आहे. या गाडीचे वजन १५५ किलो असून त्याची इंधन टाकी १२ लिटरची आहे. याशिवायही तांत्रिक बाबतीत ही गाडी अतिशय सरस असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही गाडी इंडोनेशियामध्ये सध्या वापरात असून तिथे ती लोकप्रिय आहे. मात्र या गाडीची किंमत अद्याप स्पष्ट झालेली नाही.