News Flash

चवीबरोबरच आरोग्याचा विचार

मसाल्यांच्या पदार्थाच्या व्यापारासाठी पूर्वापार प्रसिद्ध असलेला आपला देश या पदार्थाच्या वापरासाठीही ओळखला जातो. भारतीय आहारात त्यांचा दैनंदिन वापर अपरिहार्य आहे.

मसाल्याचे पदार्थ

पल्लवी सावंत – response.lokprabha@expressindia.com

खावे नेटके

मसाल्यांच्या पदार्थाच्या व्यापारासाठी पूर्वापार प्रसिद्ध असलेला आपला देश या पदार्थाच्या वापरासाठीही ओळखला जातो. भारतीय आहारात त्यांचा दैनंदिन वापर अपरिहार्य आहे. त्यांना असलेल्या औषधी गुणधर्मामुळे आपल्या पूर्वजांनी त्यांची योजना दैनंदिन आहारात केली. या पदार्थाची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे.

बडीशेप :

मुखशुद्धीसाठी खाल्ली जाणारी बडीशेप, बडीशोप किंवा सौंफ अत्यंत गुणकारी मानली जाते. क्वारसेटिन नावाच्या मूलद्रव्यामुळे बडीशेपमध्ये औषधी गुणधर्म असतात. बद्धकोष्ठ किंवा अपचनाचे विकार असणाऱ्यांनी रोज एक चमचा बडीशेप खाणे उपयोगी ठरते. त्यातील तंतुमय पदार्थ जठरातील आम्लांसोबत शरीरातील कमी घनतेच्या स्निग्धांशांवर (एलडीएल) अंकुश ठेवण्याचे काम करतात. (१०० ग्रॅम बडीशेपमध्ये किमान ४० ग्रॅम तंतुमय पदार्थ असतात.) अनेथॉल, पायनिन, मिरसी, एंकोल, अ‍ॅनिसिक आल्डिहाइड यांसारख्या मूलद्रव्यांमुळे रक्त शुद्ध होणे, रोगप्रतिकारशक्ती वाढणे आणि आतडय़ातील  गॅसेसचे प्रमाण कमी करण्यासाठी बडीशेप उपयुक्त आहे. बडीशेप केवळ जेवल्यानंतरच खावी असा समज आहे. परंतु फोडणीमध्ये बडीशेप वापरल्यास खाद्यपदार्थाची चव तर वाढतेच आणि पचनक्रिया सोपी होण्यासाठीदेखील मदत होते. डाळींचे लाडू तयार करताना बडीशेप जरूर वापरावी.

सुंठ :

सुंठ म्हणजे कोरडं आलं. सुंठ पोटाचे विकार शमविण्यासाठी उपयुक्त आहेच शिवाय यातील मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमचे जास्तीचे प्रमाण शरीरासाठी गुणकारी आहे. सुंठ हृदयरोग, संधिवात, हाडांचे विकार होऊ नयेत याची उत्तम काळजी घेते. इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी असणाऱ्यांसाठी सुंठ अत्यंत औषधी आहे. आहारातील सुंठ ही स्वादुिपडामधील ट्रिप्सीन आणि लायपेज यांच्यावर परिणाम करून पचनक्रिया सोपी करण्याचे काम करते. भारतातील काही भागांत जेवणानंतर सुंठ खाण्याचा प्रघात आहे. किंबहुना अलीकडे मुखशुद्धी म्हणून मिळणाऱ्या वेगवेगळ्या मिश्रणात सुंठ वापरलेली असते. सुंठ, गूळ एकत्र करून नियमितपणे खाल्ल्यास अर्धशिशीचा त्रास कमी होऊ शकतो.

दगडफूल :

अलीकडे मिळणारी स्पाइस्ड लाते नावाची कॉफी दगडफूल दुधामध्ये विशिष्ट तापमानावर उकळून त्यात इतर मसाल्यांचे मिश्रण वापरून तयार केली जाते. फुलाच्या आकाराचा दिसणारा हा मसाल्याचा पदार्थ दिसायला जितका देखणा आहे तितकाच त्याचा गंधदेखील गोड असतो. एनेथॉल नावाच्या द्रव्यामुळे दगडफुलाचा गोड गंध कॉफीची लज्जत वाढवतोच, शिवाय कॅफिनमुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांपासून वाचवतो. एनेथॉल हे १३ पट जास्त गोड असते. दगडफुलातील स्निग्ध पदार्थ रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

दालचिनी :

मसाल्यांमधला सर्वात गुणकारी पदार्थ म्हणजे दालचिनी. उष्ण आणि शीत असे दोन्ही परिणाम देणारी दालचिनी शरीरासाठी अत्यंत उपयुक्त  आहे. युगेनॉल नावाच्या स्निग्धद्रव्यामुळे दालचिनीला एक विशेष गंध असतो.  रोगप्रतिकारक शक्तीवर्धक म्हणून दालचिनीचा उपयोग होतो. मेंदू शांत ठेवण्यासाठी, हिरडय़ांच्या आरोग्यासाठी दालचिनी उपयुक्त आहे. दालचिनीचे खोड (ज्याला आपण बोलीभाषेत काडी असेदेखील म्हणतो) रक्त प्रवाही राहण्यासाठी आणि हृदयरोग प्रतिबंध करण्यासाठी उपयुक्त आहे. लोह, मॅग्नेशिअम, िझक (जस्त) यांचे मुबलक प्रमाण असणारे दालचिनीचे खोड शरीरातील लोहाचे प्रमाण सुरळीत राखण्यासाठी तसेच कॅल्शिअमची उपलब्धता वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. मधुमेही रुग्णांनी दालचिनीचे खोड पाण्यात टाकून ते पाणी नियमित प्यायलास फायदा होतो. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी सकाळी दालचिनी पावडर घालून पाणी प्यायल्यास शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. स्त्रियांच्या आहारात दालचिनी नियमित असल्यास हाडांचे आरोग्य राखण्यास मदत होते.

लवंग :

मसाल्याच्या डब्याचा खमंगपणा वाढवणारा घटक म्हणजे लवंग. खरं तर दालचिनी आणि लवंग सोबतच वापरले जातात. किंबहुना या दोन पदार्थातील स्निग्धद्रव्यांमध्ये देखील बरीच समानता आहे. युगेनॉल या स्निग्धद्रव्यांमुळे दातांचे आरोग्य राखले जाते आणि दाढदुखीदेखील थांबते. वारंवार अपचन आणि बद्धकोष्ठ आहे त्यांनी आहारात किमान चिमूटभर लवंगपूड जरूर वापरावी. त्वचेचे विकार असणाऱ्यांनी लवंग पाण्यात उकळून ते पाणी नियमितपणे प्यावे.

जीवनसत्त्व अ, ब आणि क चे उत्तम प्रमाण असणारी लवंग रोगप्रतिकारकशक्ती वाढवतेच शिवाय त्वचा, केस आणि नखांचे आरोग्य सुधारते. ‘मसालेदार’ पदार्थामध्ये वापरली जाणारी लवंग पदार्थ शिजायला आणि पचायला हलका व्हायला मदत करते. त्यातील स्निग्धद्रव्ये कबरेदकांचा उत्तम परिणाम देतात.

वेलदोडे :

मुखशुद्धीसाठी वापरले जाणारे काळसर बीज म्हणजे वेलची किंवा वेलदोडे! वेलदोडय़ाचे तेल अत्यंत गुणकारी आहे. ते शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवते. शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात आणते. बद्धकोष्ठ कमी करते, मेंदूतील पेशींचे आरोग्य राखते आणि शरीराला आवश्यक ऊर्जा देते. या गुणांमुळे वेलदोडे परिपूर्ण आहेत. पोटॅशिअम, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम यांचे उत्तम प्रमाण असणारे वेलदोडे रक्तदाबावर गुणकारी आहेत. याचसोबत वेलदोडय़ांमध्ये असलेले लोहाचे प्रमाण आरोग्यवर्धक आहे. वेलदोडय़ाची पूड पोटाच्या विकारांवर औषधी आहे. गोड पदार्थामध्ये वेलची पूड वापरल्यामुळे ते पदार्थ पचनाला हलके होतात.

या तसेच या आधीच्या लेखात आपण पाहिलेले भारतीय गृहिणीच्या स्वयंपाकघरात हमखास आढळणारे हे मसाल्याचे पदार्थ केवळ चवीढवीसाठी नाही तर औषधी गुणधर्मासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांच्या नियमित सेवनाने आरोग्य राखण्यासाठी मदत होऊ शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 3:49 pm

Web Title: indian spices for good health
Next Stories
1 Jio ने हटवला ₹49 चा प्लॅन, आता ₹75 पासून सुरूवात
2 कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय वापरता येणार एअरटेलची ‘ही’ नवी सेवा
3 बाळाला पावडरचं दूध पाजताय का?
Just Now!
X