खासगी विमान कंपनी इंडिगोच्या प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. कंपनीने आता प्रवाशांसाठी डोर-टू-डोर बॅगेज ट्रान्सफरची सेवा सुरू केली आहे. याचाच अर्थ प्रवाशांचं सामान घरापासून त्यांना जिथे जायचं आहे त्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवण्याची सेवा मिळेल. ऑफिसच्या कामानिमित्ताने विमान प्रवास करणाऱ्यांना अनेकदा विमानतळावरुन थेट मिटिंगच्या ठिकाणी जावं लागतं. त्यावेळी बरोबर असलेल्या एखाद्या बॅगची कटकट जाणवते. पण आता या समस्येवर इंडिगोने तोडगा काढला आहे.

२४ तास आधी करावी लागणार बुकिंग :

इंडिगोने या सेवेसाठी कार्टरपोर्टर नावाच्या एका कंपनीसोबत भागीदारी केली आहे. इंडिगोच्या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं सामान पोहोचवण्याची जबाबदारी कार्टरर्पोटर कंपनीवर असेल. सध्या इंडिगोची ही सेवा दिल्ली आणि हैदराबादमध्ये सुरू झाली आहे. १ एप्रिलपासून ही सेवा सुरू झालीये. लवकरच मुंबई आणि बँगलोरसाठीही ही सेवा सुरू होणार असल्याचं, इंडिगोकडून सांगण्यात आलं आहे. इंडिगोने या डोर-टू-डोर सेवेला ‘6EBagport’ असं नाव दिलं आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना 24 तासआधी बुकिंग करावी लागेल. यासाठी प्रवाशांकडे अतिरिक्त 630 रुपये आकारले जातील.

वेळेची होणार बचत :-

या सेवेमुळे प्रवाशांच्या वेळेची बरीच बचत होईल. जवळ सामान नसल्यामुळे विमानतळाच्या सुरक्षा आणि चेक-इन काउंटरवर कमी वेळ लागेल. इतकंच नाही तर विमानतळावरुन थेट एखाद्या मिटिंगला किंवा अन्य महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं असेल तरी जाता येईल आणि त्या प्रवाशाचं सामान सांगितलेल्या ठिकाणी पोहोचेल. शिवाय या सेवेची बुकिंग करणाऱ्यांना बॅगेज डिलिव्हरी काउंटरवरही प्रतीक्षा करावी लागणार नाही.