करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या लहान मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र बालकांमध्ये विषाणूचा संसर्ग तीव्र स्वरूपाचा नसल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. तिसऱ्या लाटेमध्ये बालकांमध्ये करोना संक्रमणाचा धोका अधिक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पाश्व्रभूमीवर बालकांना फ्लू प्रतिबंधक इन्फ्लुएन्झाची लस देणे फायदेशीर आहे. इन्फ्लुएन्झा लशीमुळे फक्त फ्लूपासून संरक्षण होते. करोना संक्रमणापासून संरक्षण मिळत नाही.

करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक जोखमीच्या गटात असल्याचे दिसून आले, तर दुसऱ्या लाटेमध्ये तरुण वर्गामध्ये संसर्गाची तीव्रता अधिक असल्याचे जाणवले. सध्या १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू असून या वयोगटातील नागरिकांमध्ये करोनाचा धोका संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये कमी असण्याची शक्यता आहे. परंतु १८ वर्षांखालील बालकांना अद्याप करोनाची लस उपलब्ध न झाल्याने या वयोगटात करोनाचा प्रादुर्भाव  होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या वयोगटाला बाधा होऊ  नये याची काळजी घेणे गरजेचे आहे.

जून महिना सुरू झाला असून काहीच दिवसात पावसाळ्यात उद्भवणारे फ्लूजन्य आजार डोके वर काढायला सुरुवात करतील. इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे होणारा फ्लू आणि इतर फ्लूजन्य आजार श्वासोच्छावासाच्या मार्फत पसरतात. सर्वसाधारणपणे सौम्य असणारा फ्लू हा पाच वर्षांखालील बालकांमध्ये गंभीर स्वरूप धारण करू शकतो. इन्फ्लुएन्झा न्युमोनिया यांसारख्या आजारांची बाधा झाल्यास बालकांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते. मूत्रपिंड, हृदय, फुप्फुसे, यकृत इत्यादी आजार असणाऱ्या, मधुमेह असलेल्या रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असलेली मुले आणि लठ्ठ मुलामध्ये फ्लू तीव्र आणि घातक ठरू शकतो. अशा मुलांची गणना जोखमीच्या गटात केली जाते. इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स या अखिल भारतीय बालरोगतज्ज्ञांच्या संस्थेने सहा महिने ते पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना ही लस देण्याची शिफारस केली आहे. जोखमीच्या गटातील मुलांनीही ही लस घ्यावी असे म्हटले आहे.

या आजारात मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, अंग आणि डोकेदुखी ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात. काही बालकांना जुलाबही होतात. ही लक्षणे करोनासदृश असल्याने बालकांना करोनाची बाधा तर झाली नाही ना अशी शंका उपस्थित होऊ  शकते. त्यामुळे चाचण्या कराव्या लागतील. तसेच फ्लूजन्य आजारांमुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताणही वाढतो. तेव्हा इन्फ्लुएन्झाची लस बालकांना दिल्यास किमान फ्लूजन्य अन्य आजारांची लागण होण्याचा धोका कमी होईल. परिणामी करोना नियंत्रणामध्ये आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढलेला असताना फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी होईल आणि आरोग्य व्यवस्थेवरील भार कमी होण्यास मदत होईल.

इन्फ्लुएन्झाच्या लशीमुळे करोनापासून संरक्षण मिळेल का?

इन्फ्लुएन्झा आणि करोना हे दोन वेगवेगळ्या विषाणूंपासून होणारे आजार आहेत. वातावरणात इन्फ्लुएन्झा ए आणि बी असे दोन मुख्य प्रकारचे विषाणू आढळून येतात आणि या प्रत्येकाचे दोन उपप्रकार असे एकूण चार विषाणू वावरतात. त्यामुळे इन्फ्लुएन्झा लशीमुळे करोनापासून संरक्षण मिळणार नाही. परंतु पावसाळ्यात होणाऱ्या फ्लूपासून नक्की संरक्षण मिळू शकते. त्यामुळे ही लस घेतली तरी मास्कचा वापर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, हात स्वच्छ धुणे इत्यादी करोना प्रतिबंध उपायांचा वापर सुरू ठेवणे अपरिहार्य आहे.

डॉ. विजय येवले,

राज्य बालरोगतज्ज्ञ करोना कृतिदल इन्फ्लुएन्झा लस कशी घ्यावी?

इन्फ्लुएन्झा प्रतिरोधक लस अनेक वर्षांपासून बाजारात उपलब्ध असून सुरक्षित आहे. दरवर्षी वातावरणामुळे उत्परिवर्तित होऊन वेगळा पोशाख बदलून वावरणाऱ्या इन्फ्लुएन्झा विषाणूवर प्रभावी अशी नवीन लस वर्षांतून दोन वेळेस एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्यात उपलब्ध केली जाते. एप्रिलमध्ये बाजारात येणारी लस घेतल्यामुळे मुलांचे पावसाळ्यात होणाऱ्या फ्लूपासून संरक्षण करता येते. ही वार्षिक लस असून दरवर्षी ती घ्यावी लागते. ९ वर्षांखालील मुलांना ही लस पहिल्यांदा देताना त्याचे एक महिन्याच्या अंतराने दोन डोस द्यावयाचे असतात आणि त्यापुढे मात्र वर्षांतून एकदा एक डोस दिला जातो. लसीकरण झाल्यावर, प्रतिकारशक्ती निर्माण व्हायला साधारण १४ दिवस लागतात.