निद्रानाश, नैराश्य आणि मधुमेह यांसारख्या समस्या आनुवंशिक असण्याची संभावना संशोधकांनी वर्तवली आहे.

झोपेच्या समस्यांना कारणीभूत ठरणारी विशिष्ट जनुके संशोधकांना आढळून आली असून निद्रानाश, त्याचप्रमाणे नैराश्यासारखे मानसिक विकार, मधुमेह यांमध्ये आनुवंशिक दुवा आढळून आला आहे. निद्रानाशामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर घातक परिणाम होतो. हा अभ्यास ‘मॉलीक्युलर सायकीयाट्री’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.

दीर्घकाळ निद्रानाशाने त्रस्त असणाऱ्यांना दयविकार आणि मधुमेह होण्याची संभावना असते. त्याचप्रमाणे त्यांच्यात मानसिक विकार उद्भवण्याची शक्यता असते. यापूर्वी झालेल्या अभ्यासांमध्ये झोपेबाबत गुणधर्म स्पष्ट केले असून यामध्ये निद्रानाशाचा समावेश आहे. या विकारासाठी नव्या उपचार पद्धती विकसित करण्यासाठी निद्रानाशाबाबत अधिक माहिती आवश्यक आहे, असे अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील म्युरे स्टाईन यांनी सांगितले. या अभ्यासासाठी संशोधकांनी ३३,००० सैनिकांचे ‘डीएनए’ नमुने गोळा केले होते. यासाठी युरोपीय, आफ्रिकन आणि लॅटिन अमेरिकी वंशातील सैनिकांचे वेगळ्या गटात वर्गीकरण करण्यात आले होते. अभ्यासात मिळालेल्या परिणामांची तुलना यापूर्वी करण्यात आलेल्या अभ्यासातील परिणामांशी करण्यात आली. यामध्ये मधुमेह आणि निद्रानाश यांच्यामध्ये जनुकीय संबंध असल्याचे आढळले. यावेळी युरोपीय वंशातील लोकांमध्ये आनुवंशिकतेने नैराश्याचा धोका असल्याचेदेखील आढळून आले.