इन्स्टाग्राम हे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे अॅप्लिकेशन आहे. ही कंपनी फेसबुकच्या मालकीची असून युजर्सच्या सोयीसाठी त्यामध्ये सातत्याने बदल करण्यात येत आहेत. नुकताच कंपनीने १०० कोटी युजर्सचा टप्पा पार केला आहे. त्यावरुनच या अॅप्लिकेशनला असणारी पसंती आपल्या लक्षात येईलच. युट्यूबला टक्कर देण्यासाठी कंपनीने एक नवीन अॅप लाँच केले असून आयजीटीव्ही (IGTV app) असं या अॅप्लिकेशनचे नाव आहे. यामुळे इन्स्टाग्रामवर व्हिडियो अपलोड करणे सोपे होणार आहे. इन्स्टावर तब्बल एक तासाचा व्हिडिओ अपलोड करता येऊ शकणार आहे.

हे फिचर इन्स्टाग्रामने सॅन फ्रान्सिस्कोमध्ये येथे लाँच केले असून काही वेळातच ते सर्वांसाठी वापरात येईल. याविषयी कंपनीने आपल्या ब्लॉगवर सविस्तर माहिती दिली आहे. स्मार्टफोन युजर ज्या पद्धतीनं फुल स्क्रीन आणि स्क्रीन आडवा करुन व्हिडियो आणू शकतात त्याच पद्धतीने हे अॅप बनवले आहे. हे अॅप्लिकेशन टीव्हीप्रमाणे काम करणार असून ते ओपन करताच व्हिडियो प्ले होईल. विशेष म्हणजे या अॅप्लिकेशनमुळे व्हिडियो सर्च करण्याची आवश्यकता राहणार नाही. यामध्ये आपण इन्स्टाग्रामवर ज्यांना फॉलो करतो त्यांचे व्हिडियो दिसू शकतील.

यामुळे आपल्याला विविध गोष्टींचा आनंद लुटता येणार आहे. अॅपच्या खाली फॉर यू, फॉलोविंग, पॉप्युलर आणि कंटिन्यू वॉचिंग हे चार पर्याय दिले आहेत. या व्हिडियोत कमेंट करता येणार असून हे व्हिडियो शेअर करता येणार आहेत. टीव्ही आणि यूट्युबप्रमाणे आयजीटीव्हीमध्ये चॅनेल समाविष्ट आहेत हे अॅप अँड्रॉइड आणि आयओएस मोबाईल युजर्ससाठी वापर करू शकतील.