सोशल मीडिया हे सध्या आपल्यातील अनेकांच्या गळ्यातील ताईत झाले आहे. यामध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉटसअॅप याचा प्रामुख्याने समावेश होतो. दिवसागणिक ही अॅप्लिकेशन्स वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असून इन्स्टाग्रामने नुकताच युजर्सचा मोठा टप्पा पार केला आहे. इन्स्टाग्रामने १ बिलियन युजर्सचा टप्पा पार केला आहे. ही नक्कीच मोठी संख्या असून एखाद्या अॅपच्या दृष्टीने हे मोठे यश आहे असे म्हणता येईल. इन्स्टाग्राम ही फेसबुकच्या मालकीची कंपनी असून युजर्सच्या गरजेनुसार कंपनीकडून अॅपमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येतात त्यामुळे हे अॅप कमी कालावधीत प्रसिद्ध झाले.

याआधी सप्टेंबरमध्ये कंपनीने आपला आठ मिलियनचा टप्पा पार केला होता. तो जाहीर केल्यानंतर आता जवळपास ८ महिन्यांनंतर कंपनीने १ बिलियनचा टप्पा पार केल्याचे जाहीर केले. फेसबुकने २०१२ मध्ये इन्स्टाग्रामला १ बिलियन डॉलरला खरेदी केले तेव्हा फेसबुकवर मोठ्या प्रमाणात टिका करण्यात आली होती. त्यावेळी हा व्यवहार चुकीचा झाला असल्याचे अनेकांचे म्हणणे होते. मात्र आता या टप्प्यावर हा व्यवहार योग्य ठरला असेच म्हणावे लागेल. सध्या व्हॉटसअॅप आणि फेसबुक मेसेंजरही मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. मात्र त्यातही चॅटींगचा पर्याय उपलब्ध नसलेल्या इन्स्टाग्रामला नेटीझन्स पसंती देत आहेत ही आनंदाची बाब आहे.

इन्स्टाग्राम या अॅपची रचना जाहिरातींसाठी अतिशय सोयीची असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे कमाईच्या बाबतीतही हे अॅप येत्या काळात चांगला टप्पा गाठेल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याबरोबरच या वर्षाच्या अखेरपर्यंत युजर्सचा टप्पा १.१ बिलियनपर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. १०० मिलियनचा टप्पा गाठायला या अॅप्लिकेशनला चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागतो असेही सांगण्यात आले आहे.