सोशल मीडिया हा सध्या बहुतांश जणांच्या गळ्यातील ताईत झाला आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम ही यातील आघाडीवर असणारी माध्यमे आहेत. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळींपर्यंत सर्रास मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर केला जातो. इन्स्टाग्राचाही सध्या मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यामध्ये अनेकदा अश्लिल मजकूर व्हायरल होतो. मात्र यावर आळा घालण्यासाठी इन्स्टाग्रामने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यासाठी इन्स्टातर्फे नवीन फिचर आणण्यात आले आहे. सेन्सिटिव्ह स्क्रीन असं या फीचरचं नाव आहे. या फीचरमुळे अश्लील फोटो, व्हिडिओ, थंबनेल्सवर युजर जोपर्यंत क्लिक करत नाही तोपर्यंत ते ब्लर दिसतील.

वोग को यूकेच्या रिपोर्टनुसार, भारतात इन्स्टाग्राम वापरणाऱ्या युजर्ससाठी हे नवीन फीचर आणले आहे. इन्स्टाग्रामवर अश्लील फोटो, सर्च, रिकमेंड केल्यावर किंवा एखादी गोष्ट सर्च केल्यानंतर अचानक अश्लील फोटो किंवा व्हिडिओ नजरेसमोर येतो. अल्पवयीन मुलांसाठी असा मजकूर धोकादायक असतो. त्यामुळे अशा अल्पवयीन मुलांना यापासून दूर ठेवण्यासाठी हे फीचर उपयुक्त ठरणार आहे. इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मुसेरी यांनी ‘द टेलिग्राफ’ला लिहिलेल्या पत्रात हे सेन्सिटिव्ह स्क्रीन फीचर सुरु केल्याची घोषणा केली. ब्रिटनमध्ये एका अल्पवयीन मुलीने नुकतीच आत्महत्या केली होती. या आत्महत्येला प्रवृत्त करणारा मजकूर आपल्या मुलीने सोशल मीडियावर वाचल्याची तक्रार आत्महत्या केलेल्या मुलीच्या पालकांनी केली होती. त्यानंतर हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता.