20 October 2020

News Flash

International Yoga Day 2019 : योग शिकताना या चुका टाळाच

जाणून घेऊया योगा करताना कोणत्या गोष्टींची खबरदारी नक्कीच घेतली पाहिजे.

International Yoga Day  : शरीर आणि मन दोहोंचे स्वास्थ्य राखण्यासाठी योगा निश्चितच उत्तम व्यायामप्रकार आहे. उत्तम योगसिद्धी प्राप्त करायची असेल तर, सातत्य, सामर्थ्य आणि संयम असणे आवश्यक असते. सुरूवातीच्या काळात योगा शिकताना घाई किंवा काही अन्य कारणांमुळे मोठ्या चुका होण्याची शक्यता असते. या चुकांचे परिणाम गंभीर सुद्धा असू शकतात. जाणून घेऊया योगा करताना कोणत्या गोष्टींची खबरदारी नक्कीच घेतली पाहिजे.

दुसऱ्याशी तुलना करणे – योगा वर्गांमध्ये नवखे असणारे लोक बहुतेकदा इतरांशी तुलना करण्याच्या नादात स्वत:ला इजा करून घेताना दिसतात. दुसऱ्या व्यक्तीपाशी असणारी शरीराची लवचिकता किंवा त्या स्थितीत पोहचण्याचा मोह अनेकांना होतो. मात्र, प्रत्येकाच्या शरीराची ठेवण आणि आकार वेगळा असतो ही मुख्य गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. त्याशिवाय एखादी व्यक्ती किती काळापासून योगाचा सराव करत आहे, ही बाबही लक्षात घेतली पाहिजे. मात्र, योगा शिकतानाच्या सुरूवातीच्या काळात इतरांशी बरोबरी करण्याची चूक तुम्हाला चांगलीच भोवू शकते.

वयोमानानुसार शारीरिक स्थितीत होणारा बदल ध्यानात न घेणे- बदलत्या वयानुसार आपल्या शारीरिक स्थितीदेखील बदलते याचे भान अनेकांना राहत नाही. लहानपणी आपण करत असलेली एखादी गोष्ट मोठेपणीही आपल्याला जमेल असा अनेकांचा भ्रम असतो. ही गोष्ट योगा करताना फार महागात पडू शकते. वाढत्या वयामुळे शरीराची लवचिकता आणि हालचालींवर येणाऱ्या मर्यादेचा विचार केला पाहिजे. त्यामुळे गतकाळातील शरीराची ताकद आणि लवचिकतेशी तुलना करून योगासन करणे टाळा.

अपुरी माहिती आणि अतिरेक- एखादा क्रीडाप्रकार किंवा व्यायाम नियमितपणे करत असल्याने योगासन सहज जमेल असा गैरसमज तुमचा घात करू शकतो. वरकरणी सोपे दिसणारे आसन प्रत्यक्षात मात्र स्नायुंवर अधिक जोर पाडणारे असू शकते. त्यामुळे प्रत्येक आसन हे योग्य माहिती घेऊन करणे गरजेचे असते. योगा वर्गांमध्ये अनेकजण नवीन उत्साहाच्या भरात शरीरावर क्षमतेपेक्षा अधिक ताण देतात आणि मग त्यांना दुखापतीचा सामना करावा लागतो. त्यामुळे योगा वर्गांमध्ये स्वत:ची शारीरिक क्षमता जाणणे आणि प्रशिक्षकाच्या सूचना ऐकणे केव्हाही उत्तम.

सातत्याचा अभाव- योगसाधनेच्या सुरूवातीच्या काही सत्रांनंतर शरीर आणि मनाला मिळणारा निवांतपणा यामुळे अनेकजण भारावले जातात. नवीन काही तरी गवसल्याच्या उत्साहात पुढील काही दिवस नियमितपणे योग सत्रांना हजेरीही लावली जाते. मात्र, सुरूवातीचा उत्साह ओसरल्यानंतर किंवा कामाच्या धावपळीत हळुहळू योग वर्गांना नियमितपणे जाणे बंद होते. अनेक दिवस योगापासून दूर राहिल्यानंतर पुन्हा योगासाधनेला सुरूवात कराल तेव्हा कदाचित पूर्वी जमणाऱ्या अनेक गोष्टी करणे तुम्हाला शक्य होणार नाही. याचे एकमेव कारण म्हणजे सातत्याचा अभाव. त्यामुळे सुरूवातीच्या दिवसांत आठवड्यातून किमान तिनदा तरी योगाप्रकार नियमितपणे करणे चांगले.

एखादी गोष्ट न जमल्यामुळे निराश होऊन प्रयत्न सोडणे- सुरूवातीच्या काळात अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर एखादे आसन न जमल्यामुळे खूपजण निराश होताना दिसतात. एखादे आसन का जमत नाही किंवा ओणवे उभे राहिल्यानंतर पायाच्या बोटांना स्पर्श का करता येत नाही या प्रश्नांमुळेच लोक हताश होतात. निराश झालेले हे लोक मग, योगासन ही गोष्ट आपल्यासाठी नाहीच, असा ग्रह करून प्रयत्न करण्याचे थांबवतात. योगसाधनेपूर्वीची शारीरिक आणि मानसिक स्थिती आणि योगसाधनेनंतर शरीरात आलेली लवचिकता, सुधारलेली श्वसनक्रिया, योगाभ्यास केल्यानंतर तणावापासून मिळणारी मुक्ती, निवांतपणा या सकारात्मक गोष्टींचा त्यांना विसर पडतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2019 11:37 am

Web Title: international yoga day 2019 5 common mistakes yoga beginners make
Next Stories
1 ‘ट्रिपल कॅमेरा’ आणि ‘स्क्रीन साउंड’ तंत्रज्ञान, Samsung Galaxy M40 चा आज सेल
2 फेसबुकचं स्वतःचं आभासी चलन ‘लिब्रा’, टेक्स्ट मेसेजप्रमाणे करता येणार वापर
3 Revolt ची भारतातील पहिली ई-बाईक, एकदा चार्ज केल्यास 156 किमी प्रवास
Just Now!
X