आपल्यातील अनेकांचा दिवसातील बहुतांश वेळ हा ऑफिसमध्ये जातो. घरानंतर आपण सर्वात जास्त कोणत्या ठिकाणी असू तर ते ऑफीस असते. ऑफिसमध्ये कॉम्प्युटरसमोर बसून मानेचे, पाठीचे आणि हाताचे दुखणे सुरु होते. मग हे दुखणे इतके वाढते की आपल्याला काम करणे अवघड होऊन बसते. यातच व्यस्त दिनक्रमात व्यायामाला वेळ मिळत नाही असे कारण आपण कायमच सांगत असतो. पण आज जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आपण असे काही व्यायामप्रकार पाहणार आहोत जे ऑफीसमध्ये खुर्चीत बसल्या बसल्याही सहज करता येईल आणि तुम्हाला आरोग्याच्या समस्यांपासून मुक्ती मिळेल.

१. बसून चंद्रकोर

जर तुमचा दिवसातील सर्वाधिक वेळ कॉम्प्युटरवर जात असेल तर हे आसन तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल. दोन्ही हात वर घेऊन ते वरच्या बाजूने ताणले तर तुमच्या मणक्याला, मानेला चांगला आराम मिळेल. तसेच या आसनामुळे तुमचे कामावर लक्ष केंद्रित होण्यास मदत होईल.

२. मनगट आणि बोटांचे स्ट्रेचिंग

बसून काम करण्यामुळे स्नायुंवर ताण येतो. त्यामुळे मनगट आणि हाताची बोटे दुखतात. त्यामुळे या भागात जास्त रक्तपुरवठा होणे गरजेचे असते. हाताचे आणि बोटांचे व्यायाम केल्याने स्नायू ताणले जातात आणि दुखणे कमी होते. हे व्यायाम तुम्हाला अगदी सहज बसल्याजागी करता येणे शक्य आहे. त्यामुळे मोकळ्या वेळात हे व्यायाम करावेत.

३. मानेचे व्यायाम

सतत कॉम्प्युटरवर एकाच स्थितीत जास्त काळ बसल्याने मान दुखते. अशावेळी मानेचे सोपे व्यायाम केल्यास तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. मान मागच्या, पुढच्या आणि खाली-वर सगळ्या बाजूने फिरवणे आवश्यक असते. यामध्येही कान खांद्याला टेकवणे आवश्यक असते. मान आणि मणका शक्य तितका स्ट्रेच करा, जेणेकरुन या दोन्हीला आराम मिळेल. हे व्यायाम तुम्ही तुमच्या जागेवर बसून कितीही वेळा करु शकता.

४. गोमुखासन

एका हात वरुन आणि एक हात खालून पाठीमागे घ्यावा. यामुळे मणक्याला खूप चांगला व्यायाम मिळतो. यामध्ये सुरुवातीला दोन्ही हात एकमेकांना जोडले जाऊ शकत नाहीत. मात्र हळूहळू सरावाने हे जमते. ही स्थिती जास्तीत जास्त वेळ टिकवण्याचा प्रयत्न करा. त्याचा पाठीसाठी चांगला फायदा होतो.