आयफोन म्हटले की सगळ्यांच्याच भुवया नकळत उंचावतात. हा फोन वापरणे म्हणजे एकप्रकारचे स्टेटस सिम्बॉल मानले जाते. परंतु, कार्यक्षमतेचा विचार करायचा झाल्यास सध्या मोबाईल असो किंवा इतर कोणतेही डिव्हाईस असो, त्याची बॅटरी किती क्षमतेची आहे हे प्राधान्याने पाहिले जाते. मात्र जागतिक बाजारपेठेत आघाडीवर असणाऱ्या अॅपल कंपनीच्या विविध डिव्हाईसची बॅटरी लवकर उतरत असल्याचे नुकतेच समोर आले आहे. आता असे असण्याचे कारण काय? तर यामध्ये असणारी ऑपरेटींग सिस्टीम. अॅपलच्या डिव्हाईसेसमध्ये आयएसओ ११ तंत्रज्ञानाचा वापर कऱण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे अॅपलच्या डिव्हाईसेसची बॅटरी लवकर उतरत असल्याचे म्हटले जात आहे.

ही समस्या सोडविण्यासाठी अॅपल कंपनीतर्फे प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले जात आहे. याआधी अॅपलच्या डिव्हाईसेसमध्ये आयओएस १० प्रणाली वापरली जात होती. त्यानंतर आता आयओएस ११ प्रणालीचा वापर होतो. मात्र, या प्रणालीमुळे बॅटरी दीर्घकाळ टिकत नसल्याने आयफोनच्या यूजर्ससाठी हे काही प्रमाणात त्रासदायक ठरत आहे. या प्रणालीशिवायही अॅपलच्या डिव्हाईसमध्ये इतरही काही अडचणी असल्याचे समोर आले आहे.

बाजारात नव्याने आलेल्या आयफोन एक्स आणि आयफोन ८ यासाठी कंपनीने आयओएस ११ ही नवीन प्रणाली तयार केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, जुने आयफोन आणि आयपॅड यांना आयओएस ११ ही कार्यप्रणाली सुरु करण्यासाठी कोणत्याही अडचणी येणार नाहीत. सध्या बॅटरीच्या बाबतीत असलेली समस्याही अॅपलकडून लवकरच दूर करण्यात येईल अशी आशा आहे.