तुम्ही नवा आयफोन घेण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण, iPhone 11 पर्यंतच्या मोबाईल फोनसोबत आता चार्जर आणि इयरफोन मिळणार नाहीत, अशी घोषणा आयफोन बनवणाऱ्या अॅपल कंपनीने केली आहे. अॅपलने नुकताच iPhone 12 लॉन्च केला. या लॉन्चिंगच्यावेळी कंपनीने ही घोषणा केली.

अॅपलने म्हटलंय की, यापुढे iPhone 11, iPhone XR आणि iPhone SE या फोन्ससह इतर जुन्या जनरेशनच्या आयफोन्सच्या बॉक्समध्ये आता चार्जिंग अडॅप्टर आणि इयरपॉड्स असणार नाहीत.

चार्जर आणि इयरफोन न देण्याचा अॅपलने का घेतला निर्णय?

iPhone 11 पर्यंतच्या आयफोन्ससोबत चार्जर आणि इयरफोन न देण्याचा निर्णय अॅपलने का घेतला याचं कारण सांगताना कंपनीने म्हटलं की, कार्बनचं उत्सर्जन कमी करण्यासाठी कंपनीने अॅक्सेसरीज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वार्षिक २ मिलियन मेट्रिक टन कार्बन वाचवण्यास अॅपलला मदत होईल. सन २०३० पर्यंत कार्बन निष्क्रिय करण्याचे ध्येय गाठण्यास त्यामुळे मदत होईल.

आयफोनसोबत मिळणार केवळ ‘ही’ अॅक्सेसिरीज

अॅपल कंपनी आता आयफोनसोबत चार्जर आणि इयरफोन देणार नसली तरी फास्ट चार्जिंगसाठीची USB Type-C केबल मात्र देणार आहे. अॅपल इंडिया ऑनलाइन स्टोअरने देखील iPhone11 सोबत बॉक्समध्ये केवळ USB Type-C केबल असेल असे म्हटले आहे.

हे ग्राहक असतील लकी

अॅपलच्या या घोषणेनंतर ज्यांच्याकडे जुना स्टॉक उपलब्ध असेल अशा थर्ड पार्टी रिसेलर्सकडून जे युजर्स आयफोन विकत घेतील ते लकी ग्राहक असतील. कारण त्यांनाच चार्जिंग अडॅप्टर आणि इयरफोन मिळू शकेल.