नव्या आयफोनच्या प्रतीक्षेत असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. iPhone 12 कधी लाँच होणार आहे हे आता निश्चित झालं आहे. अॅपल कंपनीनं यासदर्भातील माहिती दिली आहे. अॅपलनं आपल्या विशेष इव्हेंटची तारीख जाहीर केली आहे. १३ ऑक्टोबर रोजी अॅपलचं विशेष इव्हेंट आयोजित होणार आहे. कंपनीकडून पाठवण्यात आलेल्या इन्व्हाईटमध्ये हाय स्पीड असं लिहिण्यात आलं आहे. तसंच यामध्ये अॅपलचा लोगोही निरनिराळ्या शेडमध्ये आहे. तसंच केशरी रंगाला जास्त हायलाईट करण्यात आल्याचंही दिसतंय.

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अन्य इव्हेंटप्रमाणेच अॅपलचं हे इव्हेंटदेखील व्हर्च्युअल असणार आहे. काही दिवसांपूर्वी Apple Watch Time Flies हे इव्हेंटदेखील अशाच पद्धतीनं पार पडलं होतं. १३ ऑक्टोबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता iPhone 12 Launch Event ला सुरूवात होणार आहे. अॅपलनं याची तयारीही पूर्ण केली आहे.

यापूर्वी कंपनीनं कधीही कोणते प्रोडक्ट लाँच केले जाणार आहे याची माहिती दिली नव्हती. तसंच यावेळीदेखील करण्यात आलं आहे. दरम्यान, यावेळी कमीतकमी तीन आयफोन लाँच केले जातील असं म्हटलं जात आहे. यापूर्वीपासूनच iPhone 12 चे काही स्पेसिफिकेशनही लीक झाले होते. यावेळी कंपनी नव्या रूपात iPhone 12 लाँच करण्याची शक्यता आहे. यासोबतच iPhone 12 Mini देखील यावेळी लाँच केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा सर्वात छोटी स्क्रिन असलेला आयफोन असेल. दरम्यान, यापूर्वी काही टेक साईट्सवरील माहितीनुसार iPhone 12 सोबत कंपनी चार्जर आणि ईयरफोनदेखील देणार नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे नवा आयफोन कसा असेल याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.