देशात Pegasus Spyware प्रकरण चांगलंच पेटलं आहे. या स्पायवेअरच्या मदतीने अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते अनेकांवर नजर ठेवली जात असल्याचं धक्कादायक आणि तितकंच संतापजनक वृत्त काहीच दिवसांपूर्वी समोर आलं आहे. दरम्यान, या प्रकरणासह समोर येणारी आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे पेगासस स्पायवेअर जवळजवळ सर्व प्रकारच्या फोन ऑपरेटिंग सिस्टमवर नजर ठेवू शकते. ह्याला अगदी सर्वात सुरक्षित मानले जाणारे Apple चे iPhones देखील अपवाद नाहीत. याच पार्श्वभूमीवर, आता जोरदार चर्चा सुरु झाली असून अ‍ॅपलने याबाबत आपलं निवेदन जारी केलं आहे.

बहुचर्चित पेगासस स्पायवेअर (Pegasus Spyware) प्रकरणामुळे एक गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागला कि युजर्सच्या सर्वाधिक सिक्युरिटी आणि प्रायव्हसीचा दावा करणाऱ्या आयफोनपेक्षा अँड्रॉइड फोन्सच अधिक सुरक्षित आहेत का? विशेषतः अ‍ॅम्नेस्टी इंटरनेशनलने (Amnesty International) केलेल्या विश्लेषणानंतर हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अ‍ॅम्नेस्टी इंटरनेशनलने काही पेगासस स्पायवेअर टार्गेटेड फोन्सची फॉरेन्सिक तपासणी केली. ज्यात आयफोन्सचा देखील समावेश होता. या तपासणीत काहीशी चिंताजनक बाब समोर आली आहे.

अ‍ॅम्नेस्टी इंटरनेशनलच्या फॉरेन्सिक तपासणीत iPhones बद्दल काय म्हटलंय?

पेगासस स्पायवेअरचा हल्ला झाला आहे कि नाही? हे तपासण्यासाठी अ‍ॅम्नेस्टी इंटरनेशनलने ६७ फोन्सची फॉरेन्सिक तपासणी केली. त्यापैकी ३७ फोन्सवर पेगाससने हल्ला केल्याची ठोस माहिती मिळाली. धक्कादायक म्हणजे ३७ पैकी ३४ आयफोन्स होते. तर त्यापैकी २४ फोन्सवर पेगाससने यशस्वीपणे हल्ला केल्याची ठोस माहिती समोर येत आहे. तर अन्य १३ फोन्सवरही पेगाससचा हल्ला झाल्याची माहिती आहे. मात्र, हा हल्ला यशस्वी झाला आहे का ? याबाबत माहिती उपलब्ध नाही. दरम्यान, याबाबत आता अ‍ॅपलकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

अ‍ॅपलने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

अ‍ॅपल सिक्युरिटी इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चरचे प्रमुख इवान क्रस्टिक याबाबत बोलताना म्हणतात कि, “पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांसह अन्य अनेक जणांवर होणाऱ्या या सायबर हल्ल्याचा अ‍ॅपल पूर्णपणे निषेध व्यक्त करत आहे. एक दशकाहूनही अधिक काळ सुरक्षेच्या बाबतीत (सिक्युरिटी इनोव्हेशन्सच्याबाबतीत) अँपल नेहमीच अग्रेसर राहिलं आहे. त्यामुळे, सिक्युरिटी रिसर्चर्सचा असा विश्वास आहे कि, अ‍ॅपलचे आयफोन्स सर्वात सुरक्षित आहेत.”

अ‍ॅपलने पुढे असं म्हटलं आहे कि, “मोबाईल मार्केटमध्ये आयफोन हे सर्वात सुरक्षित उपकरण आहे. मात्र, अशा पद्धतीचे सायबर ऍटॅक्स फार कठीण असतात. ते डेव्हलप करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जातात. तसेच अशा पद्धतीच्या सायबर हल्ल्यांचा वापर हा विशिष्ट व्यक्तींना टार्गेट करण्यासाठी केला जातो. याचाच अर्थ आमच्या बहुतेक युजर्सना याचा धोका नाही. तरीही आम्ही आमच्या सर्व युजर्सच्या सुरक्षिततेसाठी अथक प्रयत्न करत आहोत. आम्ही सध्या डिव्हाईस आणि त्यातील डेटासाठी नवीन सिक्युरिटी प्रोटेक्शन ऍड करत आहोत.”

व्हॉट्सअ‍ॅपनेही व्यक्त केली होती नाराजी

दरम्यान, यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपनेही (WhatsApp) या पेगासस प्रकरणावर टीका केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे प्रमुख विल कॅथकार्ट म्हणाले होते की, एनएसओ ग्रुपचं धोकादायक स्पायवेअर हे जगभरातील मानवाधिकारांच्या उल्लंघनांसाठी वापरलं जात आहे. हे प्रकार थांबवणं आवश्यक आहे. विल कॅथकार्टने याबाबत अनेक ट्विट्स केली होती.

काय आहे पेगासस स्पायवेअर?

आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो कि, पेगासस हे एनएसओ (NSO) ग्रुप या इस्राईलमधील कंपनीने तयार केलेलं एक स्पायवेअर आहे. हे अन्य देशांमध्येही एक्स्पोर्ट होतं. संभाव्यतः भारतासह ४५ देशांमध्ये पेगाससचा वापर झाल्याची माहिती मिळते. हे स्पायवेअर अत्यंत प्रगत आणि शक्तिशाली आहे. एका अहवालानुसार एखाद्या व्यक्तीची हेरगिरी करण्याचा खर्च सुमारे ७० लाख रुपये आहे. हे एखाद्या विशिष्ट डिव्हाईसचा कॉल देखील रेकॉर्ड करू शकतं. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा असा दावा आहे कि, गेली अनेक वर्षे सुमारे ५० हजार फोन्सना टार्गेट करण्यासाठी पेगासस स्पायवेअरचा वापर केला गेला आहे.