भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकींगची सुविधा उपलब्ध करुन देऊन प्रवाशांचे काम सोपे केले आहे. तुम्ही जर ऑनलाईन तिकीट बुक करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी नक्कीच महत्त्वाची आहे. IRCTC सातत्याने आपल्या ग्राहकांना एकाहून एक उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करत असते. रेल्वेने तिकीट बुकींगच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. यामुळे प्रवाशांचे काम आणखी सोपे होणार आहे. सध्या प्रवाशांना आपल्या ऑनलाईन अकाऊंटचा वापर करुन महिन्याला ६ वेळा ऑनलाईन तिकीटे काढता येतात. मात्र आता IRCTC ने ही मर्यादा वाढवली आहे. आता काही युजर्स महिन्याला १२ वेळा तिकीट बुक करता येणार आहे.

मात्र यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. ती म्हणजे जर तुम्हाला १२ तिकीटे काढण्याची मुभा हवी असेल तर प्रवाशांना आपले आधार कार्ड IRCTC अकाऊंटशी लिंक करावे लागणार आहे. याशिवाय आणखी एक बदल करण्यात आला आहे. प्रवाशांना आपली माहिती भरण्यासाठी आता केवळ २५ सेकंद मिळणार आहेत. याआधी हा कालावधी जास्त असल्याने प्रवासी शांतपणे माहिती भरु शकत होते. पण आता अतिशय कमी वेळात ही माहिती भरावी लागणार आहे. आता आधार कार्ड कसे लिंक करायचे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर त्यासाठी खाली महत्त्वपूर्ण टप्पे देण्यात आले आहेत.

१. IRCTC ला आपला आधार क्रमांक लिंक करण्यासाठी युजरला IRCTC अकाऊंटमध्ये जावे लागेल.

२. माय प्रोफाईलमध्ये जाऊन अपडेट आधार या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

३. त्यानंतर आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. हा ओटीपी IRCTC वर टाकावा लागेल.

४. अशा पद्धतीने तुमचा आधार क्रमांक IRCTC अकाऊंटशी लिंक होईल. यानंतर तुम्ही एका महिन्यात १२ तिकीट बुक करु शकणार आहात.