घरातील एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर घरातील अन्य कोणत्याही व्यक्तीचं इतर कामांमध्ये लक्ष लागत नाही. घरातलेच कशाला? आपल्याला सुद्धा एखाद्याच्या आजारपणाविषयी किंवा शारीरिक व्याधींविषयी ऐकलं तर आपल्या काळजात चर्र होतं. परंतु, सोशल मीडियावर एका व्यक्तीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत संबंधित व्यक्ती रुग्णालयातील बेडवर झोपलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. विशेष म्हणजे हा फोटो पाहून कोणत्याही व्यक्तीला दु:ख होत नसून त्या फोटोमागील सत्य जाणून घेतल्यानंतर अनेकांना हसू येत आहे.
सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक व्यक्ती रुग्णालयातील बेडवर झोपला असून त्याची शस्त्रक्रिया सुरु असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे शस्त्रक्रिया सुरु असतानादेखील त्याच्या चेहऱ्यावर हसू असल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, ही व्यक्ती अजिबात नाही. तर हा चक्क एक केक आहे.
THIS IS A CAKE. pic.twitter.com/9h9pXiYHDG
— Horror4Kids (@horror4kids) February 16, 2021
गोड पदार्थ साधारणपणे साऱ्यांनाच आवडतात. परंतु, यात केक हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. काही जण अफाट केकप्रेमी असतात. त्यामुळे या खवैय्यांसाठी अनेक बेकर विविध फ्लेवर आणि आकारातील केक तयार करत असतात. यात साधारणपणे पाणीपुरी केक, वडापाव केक, गाड्यांच्या आकाराचा केक, असे विविध केक तयार केले जातात. परंतु, एखाद्या व्यक्तीच्या शस्त्रक्रियेचा केक तयार केल्याचं किंवा तो कापल्याचं कधी ऐकलं आहे? नाही ना…पण हो एका बेकरने असा केक तयार करत अनेकांना आश्चर्यचकित केलं आहे.
बेन कुलेन या बेकरने हा आश्चर्यकारक hyper realistic cake तयार केला आहे. या युजरने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोंमध्ये एका फोटोत एक व्यक्ती रुग्णालयातील बेडवर झोपली असून अन्य फोटोंमध्ये त्यांच्या हाता-पायाचे काही भाग शरीरापासून वेगळे केल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, बेन कुलेन हे ‘द बेक किंग’ या नावानेदेखील ओळखले जातात. मागील वर्षी त्यांनी चॉकलेट आणि व्हॅनिलापासून असाच एक केक तयार केला होता. तोदेखील सोशल मीडियावर चर्चेत आला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 18, 2021 11:22 am