पावसाळ्यामध्ये आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती कमी असते, यामुळे थोड्याशा निष्काळजीपणामुळेही आपल्याला धोकादायक आजार होऊ शकतो. मान्सून म्हणजे आनंददायी ऋतू असतो, परंतु डेंग्यू, मलेरिया आणि बर्‍याच मौसमी आजारांचा प्रसार आणि मोठ्या संख्येने पसरत असतो. अशा परिस्थितीत या हंगामात स्वत:ला आणि कुटुंबाला निरोगी ठेवणे एक आव्हान असते. एकीकडे, देशभरात करोनाच्या साथीच्या विळख्यात आपण सापडलो आहोत. अशा परिस्थितीत, आपण किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळून आली तर चिंतेची स्थिती निर्माण होऊ शकते. म्हणूनच, या हंगामात आपल्या अन्न आणि राहण्याच्या सवयीची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. खरं तर, या मान्सून मध्ये थोडा निष्काळजीपणा झाल्यास आपण कोणत्यातरी जीवाणूचा बळी ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात मान्सूनच्या आजारांना बळी न पडता निरोगी राहण्यासाठी काय करायला हवं.

व्हिटॅमिन सीचे प्रमाण वाढवणे:

आपल्या शरीरातील प्रक्रियांसाठी उपयुक्त असलेल्या व्हिटॅमिन्सपैकी व्हिटॅमिन सी हे अत्यंत लाभदायक आहे. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ति वाढविण्यासाठी, हाडे बळकट करण्यासाठी, त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी ‘सी’ व्हिटॅमिन फायदेशीर ठरते. पावसाळ्यामध्ये बर्‍याच प्रकारचे व्हायरस आणि बॅक्टेरिया सक्रिय होतात, ज्यामुळे विषाणूजन्य ताप, एलर्जी सहज होऊ शकतात.म्हणूनच या हंगामात आपण जास्त व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले अन्न खाणे फार महत्वाचे आहे.

प्रतिकारशक्तीची काळजी घ्या:

पावसाळ्याच्या दिवसात असे अन्न खा जे तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते. कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे की या दिवसांमध्ये आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ति कमी होत असते, त्यामुळे अधिकाधिक ताजी फळे, भाज्या खा ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते.

प्रोबायोटिक्सचा वापर करा:

आपल्या आहारात दही इत्यादींचा समावेश करा. त्यांच्यात असलेले प्रोबायोटिक्स पोटाचे चांगले बॅक्टेरिया निरोगी व मजबूत बनवतात आणि आपल्याला बर्‍याच रोगांपासून वाचवतात, दक्षिण भारतीय अन्न प्रोबायोटिक्सचा चांगला स्रोत आहे. यामध्ये इडली, डोसा आणि यीस्टयुक्त पदार्थ आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात.

जंक फूडपासून दूर रहा:

पावसाळच्या दिवसात शक्यतो आपण सगळ्यांनी घरचे जेवण करणे महत्वाचे आहे. कारण बर्‍याच प्रकारचे धोकादायक सूक्ष्मजीव जंक फूड किंवा स्ट्रीट फूड वरच्या खाद्य पदार्थांवर पसरतात. त्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होऊन आपल्याला आजारी बनवू शकतात.

घरच्या आसपासचा परिसर स्वच्छता ठेवणे:

आपल्या सर्वांना करोना काळात स्वच्छतेचे महत्त्व चांगलेच समजले आहे आणि आता तो आपल्या सवयींचा एक भाग देखील बनलेला आहे. तथापि पावसाळ्याच्या दिवसात स्वच्छता आणखी महत्त्वाची आहे. यामुळे कोणत्याही आजाराची लागण आपल्याला होत नाही.

डासांपासून दूर रहा:

आता पावसाळा म्हटलं की डासांचा प्रादुर्भाव हा आधिक वाढतच जातो. शक्यतोवर डासांना वाढू देऊ नका. घराच्या बाहेर किंवा घरात जास्त काळ पाणी साठवून ठेऊ नका. कारण त्यामुळे डासांचं प्रमाण अधिकच वाढते. यामुळे आपण साथीच्या आजारांना बळी पडू शकतो. जर डास असतील तर योग्य काळजी घेऊन आपल्या हातापायांना लोशन लावा आणि झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.

पावसाळ्याच्या दिवसात व करोनाच्या परिस्थितीत या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता योग्य काळजी घ्या आणि निरोगी रहा.