News Flash

इटालियन कॉफी आणि बरंच काही…

कॉफी पॉड मशीन्स कॉफीप्रेमींसाठी छान गिफ्ट आहे.

कोणत्याही इटालियन कॅफे-बारमध्ये तुम्ही फक्त कॉफीची ऑर्डर दिली तर तुमच्यासमोर एक्स्प्रेसोचा कप येईल.

खाऊ आनंदे
कॉफी म्हणजे भरपूर दूध आणि भरपूर साखर असं आपलं, भारतीयांचं समीकरण असतं. इतरत्र अशी कॉफी प्यायली जात नाही. कॉफीचे चाहते इटालियन लोक कशी कॉफी पितात याविषयी..

इटली हा हिरवाईने नटलेला निसर्गरम्य देश. इटलीला स्थापत्यशास्त्र, कला, संगीत अािण याचबरोबर पाकशास्त्राचीदेखील प्राचीन परंपरा आहे. आपल्याकडे जशी दर दहा कोसांवर भाषा आणि पदार्थाची चव बदलते, तसेच इटलीतदेखील पदार्थाच्या बाबतीत आहे. इटलीचे शेफ जगात खूप प्रसिद्ध आहेत. इटालियन लोक आपल्या पदार्थाबद्दल फार संवेदनशील असतात. त्यांच्या पदार्थामध्ये इतरांनी इतर काहीही मिसळलेलं त्यांना बिलकूल आवडत नाही. आणि त्याबद्दल ते अगदी स्पष्टपणे नापसंती व्यक्त करतात. तुम्हाला ‘क्वीन’ सिनेमामधला कंगना राणावतचा तो सीन नक्की आठवत असेल. त्यात तो शेफ कंगनाला त्याने केलेल्या डिशमध्ये इतर मसाले टाकू नको म्हणून टोकतो. बऱ्याच जणांना असं वाटत असेल की, हे असं फक्त सिनेमात घडत असेल, प्रत्यक्षात नाही. परंतु माझ्या इटली भेटीमध्ये एकदा नाही तर चक्क दोन वेळा मला इटालियन शेफच्या नापसंतीदर्शक मुद्रेचा सामना करावा लागला. (अर्थात तमाम भारतीयांप्रमाणे मीदेखील माझ्या ‘गोड’ आणि ‘तिखट’ स्वादाची सवय मोडली नाही.   भलेही त्या इटालियन शेफला काहीही वाटू दे.)

रोममध्ये मी एका ठिकाणी क्रीमी एक्स्प्रेसो कॉफी ऑर्डर केली. तिथल्या कॉफी बारमधल्या शेफने ती खास बनवली. रोममध्ये या कॉफीला ‘ग्रॅन कॅफे स्पेशल’ म्हणतात. या कॉफीचा मस्त नाजूक ग्लास, त्यावर मस्त डबल व्हिप क्रीम होतं. ती माझ्या टेबलवर आली तेव्हा, कडक कॉफीचा सुगंध दरवळत होता. असं असताना मी त्या कॉफी बनवणाऱ्याकडे साखरेची मागणी केली. प्रथम तर त्याने चक्क दुर्लक्ष केलं. मग एक ब्राऊन शुगरचा सॅशे दिला. आधीच्या कॉफीच्या कडूशार आठवणीने मी साखरेचे आणखी दोन सॅशे मागितले. अतिशय नापसंती दाखवत त्याने ‘‘फ्रॉम एशिया, एशियन?’’ असा प्रश्न विचारला आणि मी हो म्हटल्यावर कपाळावर आठय़ा पाडत दोन ब्राऊन शुगरचे छोटे सॅशे हातात ठेवले. त्याच्या अप्रतिम कॉफीमध्ये मी विष कालवत असल्याचे भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. मी अगदी निवांतपणे ब्राऊन शुगर टाकून गोड क्रीमी कॉफीचा आस्वाद घेतला खरा.. पण नंतर माझ्या इटालियन मैत्रिणीकडून कळले की, ती स्पेशल कॉफी तिच्या ओरिजनल चवीनुसार घ्यायची असते. अर्थात त्याकरिता तुम्हाला कॉफीची कडूशार टेस्ट डेव्हलप करावी लागते. आपल्या भारतीयांचा, त्यातही विशेषत: मराठी माणसांचा, चवीच्या बाबतीत परदेशात थोडासा प्रॉब्लेम होतो. आपल्याला लहानपणापासून गोड कॉफी, चहा किंवा मसालेदार भाज्या, डाळी खायची एवढी सवय असते की आपल्या जिभेला अशा बिनमसाल्याच्या डिश किंवा कडू कॉफी घेणे थोडे कठीणच जाते. पण एकदा तुम्ही जिथे जाल तेथील पदार्थ मोकळ्या मनाने चाखायला सुरुवात केली आणि त्याची टेस्ट डेव्हलप केलीत की त्या त्या क्युझीनचा तुम्ही आनंद घेऊ शकता. आता कॉफीकडे वळलोच आहोत तर इटालियन कॉफीचे स्वरूप समजून घेऊ.

कोणत्याही इटालियन कॅफे-बारमध्ये (दचकू नका. इटलीमध्ये कॉफी बार असतात. तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफी सव्‍‌र्ह केल्या जातात.) तुम्ही फक्त कॉफीची ऑर्डर दिली तर तुमच्यासमोर एक्स्प्रेसोचा कप येईल. ती खूप स्ट्राँग कॉफी असते. तुम्हाला कमी स्ट्राँग हवी असेल तर कॅफे अमेरिकानोची ऑर्डर करायला हवी. परंतु ही कॅफे अमेरिकानोदेखील भारतातच, नव्हे तर यू. के.मध्ये मिळणाऱ्या अमेरिकानोपेक्षा स्ट्राँग असते.

इटलीमध्ये कॉफी हे लोकप्रिय आणि आवडते पेय आहे.

कॅफे (एक्स्प्रेसो) : तुम्ही कॉफी ऑर्डर केल्यावर एक्स्प्रेसो तुमच्या टेबलवर सव्‍‌र्ह केली जाते. भारतातल्या कॉफी कपची सवय असेल तर नक्कीच तुम्ही चकित व्हाल. कारण आपल्याकडे जसे शोकेसमध्ये ठेवायचे छोटे छोटे कप असतात, तशा छोटय़ा कपात २० मिली स्ट्राँग कॉफी तुमच्या पुढय़ात येते.

कॅफे दोपिओ : यात दोन एक्स्प्रेसो कॉफी एका कपात सव्‍‌र्ह करतात.

कॅपे रिस्ट्रेते : एक्स्प्रेसो कॉफीचे अधिक कडक अािण दाट स्वरूप. ही कॉफी साधारणत १५ मिली सव्‍‌र्ह केली जाते.

कॅफे माचितो : एक्स्प्रेसो कॉफीमध्ये किंचितसे दूध घालून माचितो बनवतात.

यातही तीन वेगवेगळे उपप्रकार आहेत.

माचितो काल्दो : गरम दूध + एक्स्प्रेसो कॉफी

माचितो काल्दो : थंड दूध + एक्स्प्रेसो कॉफी

माचितो कान शुमादी लाते : फेसाळलेले दूध + एक्स्प्रेसो कॉफी

कॅफे अमेरिकानो : ही मोठय़ा कपात सव्‍‌र्ह करतात. एक्स्प्रेसो कॉफीचे थोडे सौम्य स्वरूप. साधारणत: ८० मिली गरम पाणी उकळल्यानंतर त्यात कॉफी घालून अमेरिकानो बनवली जाते.

कॅपिचिनो : इटलीतल्या कॉफीबारमध्ये कॅपिचिनो बनवताना बघणे मी फार एन्जॉय केले. अगदी मन लावून कॉफी मेकर ही कॉफी बनवतात. एक्स्प्रेसो कॉफीमध्ये एक तृतीयांश उकळते दूध एवढय़ा एकाग्रतेने ते एकत्र करतात. त्यानंतर एक तृतीयांश  फेसाळते दूध तितक्याच नजकतीने आणि हळूवारपणे त्यात टाकले जाते. त्यावर कॉफी पावडर किंवा कोको पावडर टाकून तुमच्या पुढय़ात अदबीने ठेवले जाते. इटलीमध्ये केवळ ब्रेकफास्टला कॅपिचिनो सव्‍‌र्ह केली जाते. लंच किंवा डिनरनंतर इतकेच नव्हे तर सकाळी ११ नंतर कॅपिचिनो तुम्हाला कुठल्याही इटालियन रेस्टॉरंटमध्ये मिळणार नाही.

कॅफे शुमातो : यामध्ये फेसाळते दूध वर जास्त प्रमाणात ओतले जाते.

कॅफे कोरेतो : एक्स्प्रेसोमध्ये किंचित लिकर मिक्स करून ही कॉफी सव्‍‌र्ह करतात.

कॅफे बोरगेट्टी : एक्स्प्रेसो कॉफीमध्ये बोरगेट्टी प्रकारचे लिकर मिक्स करून ही कॉफी सव्‍‌र्ह करतात. इटलीमध्ये सॉकरच्या मॅचेसच्या वेळी ब्रेकमध्ये ही कॉफी दिली जाते.

कॅफे फ्रेदो : आपल्याकडच्या कोल्ड कॉफीचा हा इटालियन अवतार. सर्वसाधारणपणे उन्हाळ्यात हा सव्‍‌र्ह करतात.

कॅफे कॉन पॅना : एक्स्प्रेसो कॉफीवर क्रीम टाकून हा प्रकार बनवला जातो.

कॅफे लाते : गरम दुधात कॉफी टाकून ते ग्लास मध्ये सव्‍‌र्ह केले जाते.

ग्रॅन कॅफे स्पेशल : डबल क्रीम एक्स्प्रेसो कॉफीमध्ये टाकून ही खास कॉफी बनवली जाते. रोममधील ‘कॅफे एस्तारिओ’ नावाचा कॉफी बार या कॉफीसाठी प्रसिद्ध आहे.

कॅफे फ्रेदो / कॅफे आइस्ड एक्स्प्रेसो

साहित्य –  एक्स्प्रेसो पावडर एक चमचा, फुल क्रीम दूध ३/४ कप, बर्फाचे तुकडे, साखर – चवीनुसार

कृती –  कॉफी मेकर मशीनमध्ये एक्स्प्रेसो कॉफी बनवून घ्या. तुमच्याकडे एक्स्प्रेसो मशीन नसेल तर कॉफी बनविण्याचे फ्रेंच प्रेस भांडे मिळते (कोणत्याही मोठय़ा कॉफी शॉपमध्ये मागणी केल्यास विकत मिळते.) त्या भांडय़ात एक चमचा एक्स्प्रेसो कॉफी आणि एक कप उकळते पाणी टाकून एक्स्प्रेसो कॉफी बनवून घ्या. या कॉफीमध्ये ३-४ कप चिल्ड दूध, साखर आणि बर्फाचे तुकडे टाकून शेकरमधून व्यवस्थित शेक करून घ्या. झाली कॅफे फ्रेदो तयार.

थोडक्यात कॉफी हा इटालियन पेय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. कॉफी न आवडणारा इटालियन माणूस सापडणे जरा मुश्कील आहे. तिथे एक्स्प्रेसो कॉफी असा वेगळा शब्द वापरलाच जाता नाही. कॉफी = एक्स्प्रेसो हे समीकरण पक्के आहे. तुरीन (लवाजाचे जन्मस्थान) इथे तर प्रत्येक कॉफीप्रेमीने आपल्या इटली ट्रिपमध्ये भेट द्यावी आणि वेगवेगळ्या कॉफीच्या प्रकारांचा आस्वाद घ्यावा.

भारतामध्ये आता बरेच कॉफी शॉप, कॉफी चेन्स आहेत. ओरिजनल इटालियन कॉफीसाठी कॉफी पॉड मशीन्स भारतातदेखील उपलब्ध आहेत. कॉफीप्रेमींसाठी हे छोटेखानी मशीन एक छान गिफ्ट आहे.
डॉ. रश्मी करंदीकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2018 4:57 pm

Web Title: italian coffee
Next Stories
1 खूशखबर! विमानातही चांगल्या स्पीडचे इंटरनेट देणार ‘ही’ कंपनी
2 सकाळी कोमट पाणी आणि हळद पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे
3 सारखी नोकरी बदलण्यात आहेत ‘हे’ धोके
Just Now!
X