एखादी महिला आपल्या प्रियकराची निवड करते, तेव्हा पुरूषांची उंची हा महत्वाचा घटक ठरू शकतो, असे नुकतेच एका संशोधनाद्वारे समोर आले आहे. सुरक्षितपणाच्या आणि स्त्री-सुलभ भावनेतून अर्ध्याहून अधिक महिला जास्त उंचीचा जोडीदार असणेच पसंत करतात. राईस विद्यापीठ आणि नॉर्थ टेक्सास विद्यापीठात केलेल्या संशोधनातून जोडीदाराच्या निवडीवेळी उंचीचा घटक पुरूषांपेक्षा महिलांसाठी अधिक महत्वाचा असल्याचे समोर आले आहे. यासाठी करण्यात आलेल्या अभ्यासात अमेरिकेतील पस्तिशीच्या वयोगटातील साधारण उंचीचे ४५५ पुरूष (५फुट ८ इंच) आणि ४७० महिलांना (५फुट ४इंच) त्यांच्या जोडीदाराविषयी असलेल्या अपेक्षांविषयी विचारण्यात आले. यामध्ये १३.५ टक्के पुरूषांनी आपल्यापेक्षा कमी उंचीच्या महिला जोडीदाराबरोबर ‘डेटिंग’ करणे पसंत असल्याचे सांगितले. याउलट जवळपास ४९ टक्के महिलांनी उंचीला आपल्यापेक्षा जास्त असणा-याच पुरूष जोडीदाराबरोबर ‘डेट’वर जाण्यास आवडेल, अशी प्रतिक्रिया नोंदविली आहे.